जालना : सहकार खात्यात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी आपला विविध प्रकारचा अहवाल दरवर्षी सादर करणे गरजे आहे. मात्र जालना तालुक्यातील १३५० पैकी ३०० संस्था गायब झाल्या आहेत. आता या संस्था अवसायानात काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. साखर कारखाने, सूतगिरण्या, पत संस्था, कर्मचारी संस्था, सहकारी बँका, मजुर सहकारी सोसायटी, औद्योगिक, गृहनिर्माण, पाणी वापर, सुशिक्षीत बेरोजगार, ग्राहक संस्था, माती परीक्षण संस्था व इतर संस्थांची नोंदणी सहायक निबंधक कार्यालयात केली जाते. मात्र या संस्थांना दरवर्षी शासनाच्या नियमानुसार माहिती सादर करावी लागते. त्यात सध्या संस्थेचे कलम ७९ नुसार रिर्टन, ९७ वी घटना दुरूस्ती आदी माहिती सहायक निबंधक कार्यालयात सादर करण्यात आली नाही. संस्थेकडून वार्षिक हिशोब अथवा इतर कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. संस्थेची दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा, संचालक मंडळाची मासिक सभा घेतली जात नाही.संस्थेचे सन २०१४ अखेर लेखा परीक्षण अहवाल, लेखा परिक्षणातील दोष दुरूस्ती अहवाल, कलम ८२ नुसार सादर करण्यात आली नाही. त्यामुळे संस्थेच्या उद्देशानुसार व्यवहार चालू करण्याबाबत संस्थेचे पदाधिकारी व सभासदांची इच्छा नसल्याचे दिसून आल्याची नोटीस सहकारी संस्थांचे सहायक निबंधक एस.बी. भालेराव यांनी बजावली. ३०० संस्था बंद असून कोणताही ठावठिकाणा नाही. ही बाब तपासणीत उघड झाली आहे. त्यामुळे आता या संस्था अवसायानात काढून कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या १५ दिवसात संबंधित संस्थांनी संपर्क साधला नाही तर संचालक मंडळ व सभासदांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)सहकार खात्याने सध्या ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात सर्वप्रथम ड वर्गातील सहकारी संस्थांचा समावेश आहे. या निवडणूका घेण्यासाठी प्राधीकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ४ही निवड प्रक्रीया सहकार खात्याने केली आहे. प्राधीकरणाची निवड होताच गृह निर्माण संस्था, मजुर सहकारी संस्था तसेच पाणी वापर संस्थांचा समावेश आहे. या निवडणूकीचा कार्यक्रम ३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठी सहकार खात्याने गत सहा महिन्यांपासून सर्वच सहकारी संस्थांचा आढावा घेऊन निवडणूकीसाठी पात्र असणाऱ्या संस्थांची यादी तयार केली आहे.
३०० सहकारी संस्था जिल्ह्यातून गायब !
By admin | Updated: November 3, 2014 00:39 IST