जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. १७ सप्टेंबर रोजी या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २८९ वनराई बंधारे तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सन २०१२-१३ मधील जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती व चालू वर्षी सुरूवातीच्या कालावधीत कमी झालेला पाऊस लक्षात घेता पाणी अडविणे अगत्याचे असल्याने वनराई बंधाऱ्याचा मोहीम स्वरूपात मागील वर्षीप्रमाणे कामे घेणे आवश्यक असल्याचे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी या विशेष मोहिमेसंबंधी १५ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर पासून या विशेष मोहिमेस प्रारंभ झाला असून समारोप २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी होणार आहे.प्रत्येक गावात किमान पाच ते दहा वनराई बंधारे तयार करण्यात येणार आहेत. संबंधित गावात मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ता, आशा, रोजगार सेवक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, बचतगट, शासनाचे अधिकृत कर्मचारी तथा सेवक अशांना प्रत्येकी एक ते दोन वनराई बंधारे आस्थापित करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. लोकसहभागातून वनराई बंधारा स्थापन करण्यासाठी जागेची प्रथमत: निवड करण्यात येत आहे. लोकांना प्रोत्साहित करून वनराई बंधारा साधारणत: १० ते १५ लोकांच्या श्रमदानातून करण्यात येत आहे. बांधकामाच्या रिकाम्या गोण्या, अंगणवाडीकडील आहाराच्या रिकाम्या गोण्या वापरात येत आहेत. वनराई बंधाऱ्यासाठी लागणाऱ्या रिकाम्या गोण्या गोळा करण्यासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास आवाहन करण्यात आले आहे. वनराई बंधारे उभारणी मोहिमेचा शुभारंभ बुधवारी जालना तालुक्यातील गोंदेगाव येथून करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार आदींची उपस्थिती होती. तालुकानिहाय उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांची संख्या जालना १२, अंबड ३०, परतूर २३३, मंठा ११, भोकरदन ०३, एकूण २८९ अशी आहे. जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरमधील पहिल्या पंधरवाड्यात काही प्रमाणात पावसाने दिलासा दिल्याने नाला ओढ्यातून पाणी वाहत आहे. तेव्हा आताच ग्रामपंचायतींना आपल्या परिसरातील अंतर्गत जीवंत नाले, ओढे शोधून त्यावर वनराई बंधारे आस्थापित केल्यास मोठ्या प्रमाणात जलसाठा भुगर्भांतर्गत पुनर्भरण होऊन त्रूाची परिणती पाण्याच्या मुबलक उपलब्धतेत होण्यास मदत होणार आहे. ४त्यामुळे त्वरित नाले, ओढे यावर होणाऱ्या लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आल्याचे जि.प.चे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले. ग्रामपंचायतनिहाय विविध कामाअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या बॅगची उपलब्धता घेऊन हे नियोजन करण्यात येत आहे.
एकाच दिवसात उभारले २८९ वनराई बंधारे
By admin | Updated: September 19, 2014 00:59 IST