हिंगोली : विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनावर गेलेल्या जिल्ह्यातील २७५ ग्रामसेवकांना जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत कामावर रूजू होण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. राज्यभरातील ग्रामसेवकांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दुर करण्यात याव्यात, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा कालावधी ते सेवेत रुजू झाल्यापासून धरण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील २७५ ग्रामसेवकांनी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प झाले आहे. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच ग्रामसेवकांनी आंदोलन सुरू केल्याने विद्यार्थ्यांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. या आंदोलनाबाबत राज्यस्तरावरून चर्चा होत असल्या तरी त्यावर सकारात्मक निर्णय होत नसल्याने आंदोलन कायम आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामसेवकांना २४ तासात कामावर हजर होण्याच्या नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जि प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे यांनी तसे निर्देश पाचही तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे दिले. त्यानुसार आंदोलनात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील २७५ ग्रामसेवकांना २४ तासात कामावर हजर राहण्याच्या सोमवारी नोटिसा देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित ग्रामसेवक तत्काळ रूजू न झाल्यास त्यांच्यावर पुढील सात दिवसानंतर सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)डॉक्टरांचा संप मागेहिंगोली : राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. राज्यस्तरावरून संप मागे घेण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही सोमवारी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संप मागे घेत असल्याचे निवेदन दिले. विविध मागण्यासांठी राज्यभरात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील डॉक्टरांनी सक्रीय सहभाग घेतला. उलट सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांनी निवेदन देवून काम करण्यास पसंती दिली होती. दुसरीकडे संपामुळे ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित मिळाल्या नसल्याने तेथील रूग्णांनी सामान्य रूग्णालयात धाव घेतली. परिणामी सामान्य रूग्णालयात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जुन महिन्यात एकूण १० हजार रूग्णांनी उपचार घेतल्याची नोंद जिल्हा रूग्णालयाच्या ओपिडीत आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे अवघ्या पाच दिवसांत २ हजार ७५४ वर ओपिडी गेली आहे. बाळांत महिलांची संख्या देखील चांगलीच वाढली असून मागील महिनाभरात एकूण २७५ महिला बाळांत झाल्या होत्या. संपाच्या ५ दिवसांत ५२ महिलांनी सामान्य रूग्णालयात बाळास जन्म दिला आहे. शस्त्रक्रियांचा टक्का वाढून ४२ वर गेल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले. गतमहिन्यात १४६ रूग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. दुसरीकडे उपचारासाठी रूग्णालयात भरती होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. मागील महिन्यात १ हजार ५०० रूग्ण भरती झाले असताना गतपाच दिवसांत भरती होणाऱ्या रूग्णांची संख्या ३०५ वर गेली आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संपात सक्रीय सहभाग घेतल्यामुळे रूग्णसेवेवर अधिक ताण पडला. मागील पाच दिवसांपासून जिल्हा रूग्णालयातील सर्वच विभागात रूग्ण वाढले होती. शासनाने कारवाईचा बडगा उगारताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुपारी हा संप मागे घेतल्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. मुद्दम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
२७५ संपकरी ग्रामसेवकांना नोटिसा
By admin | Updated: July 8, 2014 00:37 IST