संतोष मगर , तामलवाडीतुळजापूर तालुक्यात ओढे, नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन १५१ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. त्यातील ४ बंधारे तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेले असून, २७ बंधाऱ्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाला कळविण्यात आली असली तरी या विभागाकडून चार वर्षापासून बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे यंदाही पावसाचे पाणी आले तसेच वाहून जाणार, यात शंका नाही.तालुक्यात साठवण तलाव, पाझर तलावाच्या माध्यमातून सिंचनाचे क्षेत्र वाढविले, असा दावा राजकीय मंडळींकडून केला जात आहे. परंतु गावाशेजारच्या ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी कुणी पुढाकार घेताना दिसत नाही. वीस वर्षापूर्वी तालुक्यात १५१ कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधणीसाठी लाखो रुपये शासनाने खर्च केले. त्यातील २७ बंधाऱ्याच्या पायामधून गळती, चॅनल दुरुस्ती, सील काँक्रीट, विंग बॉल आदींची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. याबाबतचा प्रस्ताव तुळजापूर येथील जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने पाठविला आहे. परंतु जिल्हा परिषदेकडून बंधारे दुरुस्तीसाठी तुळजापूर तालुक्याला चार वर्षांत एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे केवळ दुरूस्तीअभावी लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. त्यामुळे बंधारे दुरुस्तीसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी महादेव शिंदे, बालाजी चुंगे, सुनिल नकाते, आनंदा कांबळे, पांडूरंग लोंढे, मारुती मगर, प्रकाश माळी या शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, उपलब्ध बंधाऱ्यावर गेट बसविण्यासाठी पाच शाखा अभियंत्यांच्या नेमणूका केल्या असून, १५ आॅक्टोबरपर्यंत बंधाऱ्यावर गेट बसविण्याचे नियोजन केले असल्याचे खात्याकडून सांगण्यात येत आहे.