उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून डेंग्यूसह साथीच्या अन्य आजारांचा फैलाव झाला आहे. आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरातील तब्बल २६ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तसेच १९६ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.जिल्ह्यामध्ये सध्या साथीच्या वेगवेगळ्या आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. डेंग्यूसोबतच विषमज्वर, ताप, काविळ, गॅस्ट्रो, चिकूनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मागील काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीमध्ये जिल्हाभरात डेंग्यूची लागण झालेले २६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी काहीजण खाजगी तर काही शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्याचप्रमाणे तापाच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या साडेचारशेच्या आसपास असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्याही १९६ इतकी आहे. तसेच विषमज्वरचे ६९ तर काविळचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. विविध आजारांच्या रुग्णांची एकूण संख्या ७२२ वर असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. ताप उद्रेक कमी करण्यासाठी उस्मानाबाद शहरामध्ये ‘अॅबेट’ कार्यक्रम कृती नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)डेंग्यू हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे या रोगाचा प्रसार एडिस एजिप्टाय या डासांमुळे होतो. सदरील डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात म्हणजेच सिमेंटच्या टाकीतील पाणी, रांजण, प्लास्टिकच्या बाटल्या, घरातील शोभेच्या कुंड्या, निरुपयोगी टायर्स, तुंबलेल्या नाल्या आणि गटारीच्या पाण्यामध्ये होते. त्यामुळे चिकनगुनिया, डेंग्यू या रोगाचा फैलाव होतो. या रोगाचा उद्रेक होवू नये यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन साथरोगाचे उच्चाटन करावे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय किटकजन्य रोग प्रतिबंधक उपाययोजना संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी बी.एस. घुगे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. जे.एम. चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी, जिल्हा हिवताप अधिकारी के.डी. लोमटे, डॉ. एम.आर. पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निला धनराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले की, १५ नोव्हेंबर रोजी साथरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेवून जनजागृतीपर कार्यक्रम हाती घ्यावा. तसेच याच दिवशी सर्व गाव,परिसर स्वच्छतेची मोहीम राबिवण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे साथरोगाची गरोदर मातांनाही लागण होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विशेष मातृत्व संवर्धन दिनाचा कार्यक्रम घेवून मातांची आरोग्य तपासणी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
‘डेंग्यू’चा २६ जणांना डंख
By admin | Updated: November 13, 2014 00:50 IST