औरंगाबाद : महावितरणकडून अखंड वीजपुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. आज पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक थोड्याफार प्रमाणात सुरळीत झाले होते. मागील दोन महिन्यांत अंदाजे २२ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पालिकेला पंप बेअरिंग, जलवाहिन्या गळत्यांच्या दुरस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला आहे. महावितरणकडून अखंड वीजपुरवठा होत नसल्यामुळे हा भुर्दंड पालिकेला बसला आहे, तर नागरिकांना ऐन कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागली आहे. आज रविवारी अनेक भागांना कमी दाबाने पाणी आले. आज बहुतांश वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा झाल्याचा दावा मनपाने केला. वीज गेल्यास काय होते? जायकवाडी येथील पम्पिंग सुरू असताना अचानक वीज गेल्यास पंप स्ट्रेप होऊन बंद पडतात. त्यामुळे काही पार्ट खराब होण्याची शक्यता असते. तसेच जलवाहिनीतून प्रेशरने पाणीपुरवठा सुरू असतो, तो अचानक बंद पडल्यामुळे जलवाहिन्यांना गळती लागते. याच कारणामुळे फारोळ्यातील जलवाहिनीला २ फुटांचे भगदाड पडले होते, असे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू.जी. शिरसाठ यांनी सांगितले. चार दिवस वीज गुल गेल्या आठवड्यात चार दिवस वीज गुल झाली. शनिवारी मध्यरात्रीनंतर ३ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे १,४०० मि.मी. आणि ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा बंद होता. चार दिवसांपासून विजेचा लपंडाव होत असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. २२ मे रोजी रात्री १० वाजता पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. २३ मे रोजी दुपारी २.३५ ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत फारोळा जुन्या व नवीन पंपाची वीज गेली. फारोळा उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता. २४ मे रोजी ३ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारी महावितरणला पत्र उद्या सोमवारी महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना भेटून अखंड पुरवठ्याच्या मागणीसाठी पत्र देण्यात येणार आहे, असे उपअभियंता शिरसाठ यांनी सांगितले. काही सबस्टेशनवरील यंत्रणेची दुरुस्ती करायची असल्यास ती करून घेण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी महावितरणने अखंड वीजपुरवठा द्यावा. जेणेकरून पालिकेला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागणार नाही, अशी मागणी मनपा महावितरणकडे करणार आहे.
२ महिन्यांत २२ तास वीजपुरवठा खंडित!
By admin | Updated: May 26, 2014 01:16 IST