उस्मानाबाद : तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी १२५ जणांनी १५१ अर्ज सादर केल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या अर्जांची मंगळवारी छाननी होणार आहे.केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बुधवारपासून निवडणूक विभागाकडून नामनिर्देशन अर्जांची विक्री व स्वीकृती प्रक्रिया सुरू केली आहे. मागील पाच दिवसांत तब्बल १५१ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली तर १२५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखलही केले आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिली. उमेदवारी दाखल करण्यासाठी ९ फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती. कारखान्याचे विद्यमान चेअरमन अरविंद गोरे यांनी कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी तगडी फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे विरोधकही सरसावले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संस्था प्रतिनिधी गटामधून चित्रराव अरविंद गोरे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला आहे. याशिवाय तेर मतदार संघामधून १६ उमेदवारांनी २२ अर्ज दाखल केले आहेत. केशेगावमधून १२ जणांचे १९ अर्ज, बेंबळीत १८ उमेदवारांचे २७ अर्ज, चिखली गटामधून १९ जणांनी १७ अर्ज तर उस्मानाबादमधून १३ जणांचे २१ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत.
सव्वाशे उमेदवारांचे १५१ अर्ज
By admin | Updated: February 10, 2015 00:30 IST