रऊफ शेख, फुलंब्रीराज्य परिवहन महामंडळाचे प्रवासी वाढवा अभियान सुरू असताना सुमारे दीडशे बसेस फुलंब्री बसस्थानकात न येता रस्त्यावर थांबतात. बसस्थानकात बसलेले प्रवासी ताटकळत बसून राहतात, असे असताना वरिष्ठ अधिकारी काही कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. औरंगाबाद-जळगाव या राज्य रस्त्यावर फुलंब्री हे तालुक्याचे ठिकाण आहे. औरंगाबादहून जळगावला निघालेली बस फुलंब्रीच्या बसस्थानकात येणे बंधनकारक आहे, असे असूनसुद्धा बसचे चालक, वाहक बसला बसस्थानकात घेत नाहीत व सरळ निघून जातात. जळगावला जाणारे प्रवासी बसस्थानकात बसची वाट पाहत राहतात. बस आतमध्ये न येता बाहेर थांबून निघून गेली हे त्यांना नंतर कळते. औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर दिवसभरात चारशे तीन बसेस ये-जा करतात. त्यातील १०३ बसेस या बुलढाणा-जळगाव या आगाराच्या येतात, तर सुमारे तीनशे बसेस औरंगाबाद, पैठण, वैजापूर, गंगापूर, पुणे या आगाराच्या येतात. लांब पल्ल्याच्या बसेसपैकी दीडशे बसेस फुलंब्री बसस्थानकात न येता रस्त्यावर थांबतात व सरळ जातात. तालुका ठिकाणच्या बसस्थानकाचे त्यांना वावडे आहे. परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे याविषयी अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या; पण कारवाई होत नाही. त्यामुळे ‘प्रवासी वाढवा अभियान’ या मार्गावर तरी यशस्वी होताना दिसत नाही.
दीडशे बस स्थानकात येतच नाहीत
By admin | Updated: October 2, 2014 00:50 IST