दिनेश गुळवे , बीडजिल्ह्यातील अर्थकारणाला गती देण्यासाठी तालुका ठिकाणी विविध बॅँकांच्या चौदा शाखा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासकीय पातळीवरून गतीने चक्रे फिरविण्यात येत आहेत. या बॅँका झाल्यानंतर व्यवहार आणखी सुरळीत तर होतीलच शिवाय ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती मिळणार असल्याचा विश्वासही व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणात बॅँकांची महत्त्वाची भूमिका आहे. आज अशिक्षित व्यक्तीही बॅँकेशी जोडली जाऊ लागली आहे. एटीएम, मनी ट्रॉँस्फर, चेक, कर्ज, लॉकर आदी सुविधांमुळे बॅँके चे ग्राहक तर वाढलेच शिवाय आर्थिक व्यवहारातही गती आली आहे. सध्या जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅँकांच्या ८१ शाखा आहेत, तर खाजगी बॅँकांच्या ८ शाखा आहेत. ग्रामीण बॅँकेच्या ५१ तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ५९ शाखा आहेत.या बॅँकांच्या माध्यमातून व्यवहार केले जातात. निराधारांचे मानधन, शेतकऱ्यांसाठी कर्ज, पीक विमा, गारपीटची मदत, महिला बचत गटांना चालना देण्याचे काम असो की शैैक्षणिक कर्ज; बॅँकांच्या माध्यमातून निधी दिला जातो. यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक बहुतांश प्रमाणात बॅँकांशी जोडले गेले आहेत. अधिकाधिक नागरिकांनी बॅँकांमधून व्यवहार करावेत यासाठी शासनस्तरावरून प्रोत्साहनही दिले जाते. बॅँकेचे व्यवहार सुरक्षित व नियमानुसार असल्याने पिळवणूक होण्याचे प्रमाणही नसते. शिवाय बॅँक व्यवसाय, शेती आदींसाठी कर्ज देत असल्याने ग्रामीण विकासात बॅँकांची भूमिका महत्त्वाची आहे. असे असले तरी ग्रामीण भागाच्या अर्थचक्राला आणखी गती देण्यासाठी गेवराई, बीड, कडा, धारूर, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा, माजलगाव, शिरूर, चौसाळा, वडवणी येथे बॅँका सुरू करण्यात येत आहेत. बॅँक आॅफ इंडिया, देना बॅँक, महाराष्ट्र ग्रामीण बॅँक, आयडीबीआय, कॅनरा बॅँक या बॅँकांच्या १४ शाखा सुरू करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना होईल फायदाग्रामीण भागातील शेतकरी तालुक्याच्या ठिंकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात. नवीन होणाऱ्या बॅँका तालुक्याच्या ठिकाणासह ग्रामीण भागात होत असल्याने याचा नोकरदार, व्यावसायिक नागरिकांसह शेतकऱ्यांना उपयोग होणार असल्याचे अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक बोकाडे यांनी सांगितले. कोठे उघडणार कोणत्या बँका ?बीड- महाराष्ट्र ग्रामीण बॅँक, कडा - देना बॅँक, आयडीबीआय, धारूर- आयडीबीआय, आष्टी- आयडीबीआय, पाटोदा -आयडीबीआय, गेवराई- आयडीबीआय, बीओआय, माजलगाव -आयडीबीआय, कॅनरा बॅँक, अंबाजोगाई- कॅनरा बॅँक, शिरूर- कॅनरा बॅँक, चौसाळा- कॅनरा बॅँक, वडवणी - कॅनरा बॅँक यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात होणार नवीन १४ बँका
By admin | Updated: June 23, 2014 00:20 IST