पिशोर : कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील गोडाऊनमध्ये अवैधरीत्या खते व बियाणे यांचा मोठा साठा पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांच्या पथकाने गुरुवारी जप्त केला. या खते व बियाणांची किंमत १३ लाख २१ हजार २४३ रुपये आहे. वडोदवाडी येथील किशोर सखाहारी सपकाळ यांच्या मालकीचा हा साठा असल्याचे आढळून आले. सपकाळ यांचे चिंचोली (लिंबाजी) येथे संस्कृती कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान असतानासुद्धा त्यांनी विनापरवाना रासायनिक खते व बियाणांची साठवणूक करून चढ्या भावाने विक्री करून कच्च्या पावती पुस्तकात नोंदी घेतल्याचे आढळून आले. ग्राहकांना भाव फलकाचा बोर्ड न दाखवता माल विक्री केला. सदर विक्रीची माहिती सक्षम प्राधिकार्यांना न देता व अभिलेखे व खत-बियाणे नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, जि.प. कृषी विकास अधिकारी सीताराम कोलत, मोहीम अधिकारी अशोकराव आढाव, जिल्हा गुणनियंत्रक परीक्षक एम.एम. ढगे, विस्तार अधिकारी कृषी एस.बी. जाधव व .पं.स.चे कृषी अधिकारी एस.आर. मामेडवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके यांच्या आदेशान्वये सिल्लोडचे पो.नि. कांचन चाटे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. (वार्ताहर)
बियाणे-खतांचा १३ लाख रुपयांचा अवैध साठा जप्त
By admin | Updated: May 23, 2014 01:05 IST