समाजात आजही केली जाते महिलांची अवहेलना : महिला मुक्ती दिनी विचार व्हावाप्रकाश काळे गोवरीमहिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करता यावे, यासाठी कायद्याने स्त्री-पुरुष समानता हक्क बहाल केला. पुरुषाच्या तुलनेत महिला कुठेही मागे राहु नये, तिला तिच्या हक्काची जाणिव करून देऊन प्रत्येक क्षेत्रात महिलांनी घेतलेली झेप विकासाची नांदी ठरत असली तरी स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे आयुष्यच आज वेशीवर टांगले जात असल्याने समाजात महिलांची पिळवणूक चिंतेचा विषय बनला आहे.महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांना कायद्याने बहाल केलेला अधिकार मिळावा. समाजात सातत्याने होत असलेली महिलांची पिळवणूक कायमची थांबावी. यासाठी देशभरात सामाजिक संघटनाच्या माध्यमातून स्त्री मुक्ती लढ्याची धगधगती मशाल आजही पेटत आहे. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली असली तरी समाजात महिलांना स्वत:चे हक्क, अधिकार मिळविण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करीत भांडावे लागते. समाजात अशा असंख्य महिला आहेत, ज्यांना हक्कासाठी झुंजताना आयुष्यच मातीमोल करावे लागत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली असली तरी प्रत्यक्षात किती महिलांना त्यांच्या पूर्ण अधिकार मिळाला, हा खरा प्रश्न आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे असले तरी आज किती महिला सुरक्षित आहे, याचाही महिला मुक्ती दिनी विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक क्षेत्र आज महिलांनी व्यापले असले तरी त्यांच्या पाठीमागे लागलेला जाच आयुष्यभर महिलांची पाठ सोडायला तयार नाही. महिलांना प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले. पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याची संधी महिलांना मिळाल्याने प्रगतीचे एक पाऊल टाकल्याचे समाधान महिलांच्या चेहऱ्यावर झळकत असले तरी महिलांना समाजात जीवन जगत असताना त्यांचे हक्क, अधिकार का मिळत नाही? हे समाजातील महिलांचे धगधगते वास्तव आजही कायम आहे. समाजात महिलांची होणारी पिळवणूक आजही थांबली नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे असले तरी दिवसेंदिवस महिलांवरील होणाऱ्या अत्याचार दिवसेंदिवस वाढ होत आहे.महिला मुक्तीचा दिंडोरा आज देशभरात पिटला जातो. मग महिलांना दिवसाही एकटे फिरायला भिती का वाटते? हा अनेकांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न अनेकांच्या काळजाला छेद करणारा आहे. महिलांना त्यांचे हक्क, अधिकार मिळाला म्हणजे स्त्री मुक्ती झाली असे आपल्याला म्हणता येणार नाही तर महिला मुक्त सुरक्षिततेची पताका सर्वांनी घेऊन महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखणारी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आज काळाची गरज असल्याच्या प्रतिक्रीया समाजवर्तुळातून व्यक्त होत आहे. आज महिला मुक्ती दिन देशभरात आनंदात साजरा होईल ही परंतु स्वत:च्या हक्कासाठी महिलांचे अख्खे आयुष्यच वेशीवर टांगले आहे. त्याचे काय? महिलांचा हा न संपणारा जीवन संघर्ष थांबणार तरी कधी, हा खरा प्रश्न आहे.
हक्कासाठी महिलांचे आयुष्यच वेशीवर टांगले...!
By admin | Updated: January 3, 2016 01:28 IST