कुचना : भद्रावती तालुक्यातील विसलोन-पळसगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत पळसगाव येथील पाणीपुरवठ्याचा व्हाॅल्व्ह खराब झाल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून पाणी वाया जात होते. याबाबत पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे यांना सांगताच त्यांनी तत्काळ ग्रामसेवकांशी संपर्क साधून ही समस्या दूर केली.
याविषयी वारंवार सदस्यांकडून माहिती देऊनही या व्हाॅल्व्हच्या दुरुस्तीकडे ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून दुर्लक्ष केले जात होते.
सतत पाणी वाहत असल्याने याठिकाणी चिखल झाला असून, बेडूक आणि घाणीचे वास्तव्य आहे आणि तिथूनच पाणीपुरवठा होत असल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न चर्चेचा विषय ठरला होता.
सामान्य फंडात तसेच १५ व्या वित्त आयोगात पैसे असूनही व हा प्रश्न गंभीर असूनही त्याकडे कानाडोळा केला जात होता.
ही बाब स्वप्नील वासेकर, महेश निब्रड, सचिन जोगी या गावकऱ्यांनी पंचायत समिती सभापती प्रवीण ठेंगणे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ याबाबत ग्रामसेवक बोधनकर यांना विचारणा केली व लगेच येथील व्हाॅल्व्हची दुरुस्ती आणि पाण्याची समस्या दूर करण्यास बजावले.