अमोद गौरकर लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर (चंद्रपूर) : नियती कुणासोबत कधी कशी वागेल, सांगता येत नाही. शनिवारी कोलारी गावाने याची प्रचिती अनुभवली. या गावातल्या पाच तरुणांचा घोडाझरी तलावात बुडून दुर्दैवी अंत झाला. या पाच जणांच्या स्वरूपात कुणाचा आधार गेला, तर कुणाचे स्वप्न गेले, कुणाची वृद्धापकाळाची काठी हिरावली, तर कुठे बहिणीला राखी बांधायला भाऊच राहिलेला नाही. रविवारी एकाच वेळी या पाच जणांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा संपूर्ण ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
बाळाजी गावंडे (२४), तेजस संजय ठाकरे (१७), यश किशोर गावंडे (२२) व आर्यन इंगोले (१८) हे सहा युवक शनिवारी घोडाझरी येथे फिरायला गेले असता, त्यातील आर्यन पाण्यात न उतरल्यामुळे वाचला, तर बाकी पाच युतकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. १६) या पाचही युतकांची एकाच वेळी म्हणजे दुपारी १२:३० वाजता अंत्ययात्रा निघाली होती. संपूर्ण गाव या अंत्ययात्रेत सहभागी होते. गावातील स्मशानभूमीमध्ये पाचही जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील जनक व यश या सख्ख्या भावंडावर एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. सर्वांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होत्या.
मान्यवरांनी केले सांत्वन...यावेळी ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, चिमूर विधानसभेचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, काँग्रेस ज्येष्ठ नेते पंजाबराव गावंडे, धनराज मुंगले, नागपूर जिल्हा परिषदच्या बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, चिमूर तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय गावंडे, नागभीड तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद चौधरी, भाजपाचे राजू पाटील झाडे उपस्थित होते.