चंद्रपूर : स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण धडपडत आहे. आपण कुठेही मागे राहू नये यासाठी प्रयत्न करतात. सध्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. त्यामुळेच आई-वडील मुलांना विद्यार्थी दशेपासूनच स्पर्धा परीक्षांचे पुस्तक वाचण्याची सवय लावताना दिसत आहे. याचे उदाहरण ज्युबिली हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनीमध्ये दिसून आले. पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे पुस्तक न्याहाळताना दिसत होते. त्याच तत्परतेने शिक्षकही त्यांना मार्गदर्शन करीत होते.मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, जिल्हा ग्रंथालय अधिकारी व ग्रंथोत्सव आयोजन समिती चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युबिली हायस्कुलच्या प्रांगणात चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कवी संमेलन तथा विनोदी कार्यक्रम घेण्यात आला. याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिभावान कवितांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. तर, वक्तृत्व स्पर्धेत अनिकेत दुर्गे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उद्घाटन कार्यक्रमानंतर माधवी भट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कवि संमेलन घेण्यात आले. यावेळी ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘इंग्रजी भाषेच्या वाढत्या आक्रमणामुळे व आकर्षणामुळे मराठी भाषा संकटात सापडली आहे काय’ या विषयावर श्रीपाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. डॉ.शाम मोहरकर, धनराज खानोरकर, डॉ. इसादास भडके, सुदर्शन दिवसे, परमानंद बावणकुळे व प्रशांत आर्वे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला होता. मराठी भाषा व संस्कृती या विषयी अतिशय साधक बाधक अशी चर्चा या परिसंवादात घडून आली. स्त्री भृण हत्या, पर्यावरण, आई, शिक्षण, पक्षी, शेतकरी, वडील आदी विषयावर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी रचलेल्या कविता प्रतिभासंपन्न होत्याच सोबतच आशययुक्त होत्या. विद्यार्थ्यांच्या कवितांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसात दिला. वाचकांची गर्दीसंगणकीय युगात वाचन संस्कृती लोप पावत असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र ही संस्कृती आजही जपली जात आहे. पूर्वी आवडीनुसार ग्रंथ, कादंबऱ्यांचे वाचन केले जात होते. कालांतराणे यात आता बदल झाला आहे. वाचकांची संख्या वाढली तरी ग्रंथ, कादंबरी वाचकांची संख्या कमी झाली आहे. त्या तुलनेत स्पर्धात्मक पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मागील दशकामध्ये धुळ खात पडलेले ग्रंथालय आता विद्यार्थी वाचकांच्या गर्दीने फुल्लं दिसत आहे. येथील ज्युबिली हायस्कूलमध्ये ग्रंथ प्रदर्शनी सुरु आहे. या प्रदर्शनीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवून वाचनसंस्कृती जपली आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वेड
By admin | Updated: February 11, 2015 01:10 IST