सुरक्षा अधिकाऱ्यांचे वाहन : तिघांना अटक ; मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यताराजुरा : वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्राच्या सास्ती उपक्षेत्रातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या टाटा सुमो वाहनामध्ये शेकडो स्पेअर पार्ट भरुन भंगारात विकायला नेत असताना, पोलिसांनी टाटा सुमो जप्त केली. चोरी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मितेंद्र बल्लुला (२५), सिनू मंथन (२४) व राजू कंडे (२५) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे टाटा सुमो एमएच ३६-४८०१ या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. या वाहनात शेकडो स्पेअर पार्ट आढळून आले. आरोपींवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून टाटा सुमो व स्पेअर पार्ट जप्त करण्यात आले आहे. वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या वाहनात चोरीचा माल कुणी भरला, हा न उलगडणारा प्रश्न असून चोरीमध्ये मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चोरीचा माल हा राजुरा येथे कुठे विकला जायचा, याचीही चौकशी सुरु झाली आहे. यापूर्वीही वेकोलिचा लाखो रुपयांचा माल विकला गेल्याची माहिती असून अंधाधुंद कारभारामुळे वेकोलि क्षेत्राला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. आता हे बिंग फुटल्याने प्रकरणाचा सखोल तपास करुन या प्रकरणात गुंतलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
वेकोलिच्या वाहनातून भंगार चोरी
By admin | Updated: January 31, 2015 23:16 IST