टँकरचीही तरतूद : ५७८ उपाययोजनांचा आराखड्यात समावेशचंद्रपूर : उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ कोटी २७ लाख ५३ हजारांचा टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात मंजुरी दिली असून, ४१३ गावातील ५७८ उपाययोजनांचा या आराखड्यात समावेश आहे.सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात टंचाई कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात आली नसली तरी मे महिन्यात काही गावांमध्ये टँकर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही वर्षांपूर्वी जिवती तालुक्यासह इतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पाणीटंचाई निवारण्यासाठी सपशेल अपयशी ठरला होता. दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेने १ आॅक्टोबर २०१६ ते ३० जून २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला असून, ५७८ प्रस्तावित उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये हातपंपासह नवीन १७० विंधन विहिरींचा समावेश आहे. हातपंपासह १३ नवीन कुपनलिका, ८५ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, २९ हातपंपांची विशेष दुरुस्ती, १० ठिकाणी टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, २६४ ठिकाणी विहीर खोलीकरण करून गाळ काढणे व इनवेल बोअरचा समावेश आहे. सात ठिकाणी खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार असल्याचे प्रस्तावित आहे. तात्पुरती पूरक नळ योजना तलावामध्ये अथवा धरणामध्ये चर खोदणे व झिरे व बुडक्या घेणे, या उपाययोजनांचा कोणत्याही ठिकाणी समावेश नाही. प्रस्तावित उपाययोजनांमध्ये जिल्ह्यातील ४१३ गावे समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरींसाठी १३३ गावे, नवीन कूपनलिकांसाठी ११, नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी २०, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी १०, विहिरी खोल करून गाळ काढण्यासाठी १४७ व खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी सात गावांचा समावेश करण्यात आला आहे.टंचाई कृती आराखड्यानुसार विंधन विहिरींसाठी १ कोटी ६४ लाख ९० हजार, कुपनलिकांसाठी २३ लाख ४० हजार, नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ५९ लाख ३३ हजार, हातपंपांच्या दुरुस्तीसाठी २ लाख ९० हजार, टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी ६८ लाख ५० हजार, खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी ३ लाख ५० हजार असा ६ कोटी २७ लाख ५३ हजाराचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १० मार्च २०१७ पर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या नसल्या तरी हा आराखडा महत्वपूर्ण ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)
४१३ गावांसाठी सव्वासहा कोटींचा टंचाई आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:39 IST