चंद्रपूर : रायगड जिल्ह्यातील महाडच्या सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यात अनेक जण वाहून गेले असून अद्यापही मृतांचा आकडा स्पष्ट झालेला नाही. या घटनेनंतर जिल्ह्यातील नदी, नाल्यांवरील पूल व उड्डाणपुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरपना तालुक्यातील चंद्रपूर-भोयगाव मार्गावरील पूल धोक्याची घंटा देत आहे. या पुलावरून रात्रंदिवस कारखान्यांची जड वाहतूक होते. जड वाहन गेल्यास पूल हलत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या पुलाचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे. अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यातही महाडसारखी घटना घडू शकते, असा धोका निर्माण झाला आहे. महाड येथील घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गुरूवारी दिवसभर जिल्ह्यातील जीर्ण व धोकादायक पुलांची माहिती गोळा करण्यात व्यस्त दिसून आले. मात्र धोकादायक स्थितीत असलेल्या एकाही पुलाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नव्हती. चंद्रपूर जिल्ह्यात ६८ मोठे पूल, ९०७ लहान पूल व ७ हजार ५७० मोऱ्या आहेत. यात एकही ब्रिटीशकालीन पूल नसला तरी काही पुलांच्या बांधकामांना ४० ते ५० वर्षे लोटले आहे. निकृष्ठ काम व योग्य देखरेखअभावी या पुलांचे आयुष्य अर्ध्यावरच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील काही पूल सोडले तर सर्वच पुलांची स्थिती चांगली आहे. मात्र पावसाळ्यात अनेक पुलांवरून पाणी वाहत असते. त्यामुळे पुलाचे कठडे वाहून जाणे, खड्डे पडणे, पुलालगतचा रपटा खचणे असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहेत. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग वेळीच लक्ष देत नाही. घटना घडल्यानंतरच एखाद्या गोष्टीकडे लक्ष जाते, हे आजवरचे चित्र आहे. त्यामुळे अनेक पुलांवर अपघातास आमंत्रण मिळत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
अनेक पुलांवर जीवाचा धोका
By admin | Updated: August 5, 2016 00:56 IST