केव्हा बरसणार ? : २००५ मध्ये निर्माण झाले होते संकटवसंत खेडेकर बल्लारपूरयंदा पाऊस सारखा लांबत चालला. त्याच्या प्रतीक्षेची सीमा आता संपली. आशा व अपेक्षेची जागा निराशेने घेतली आहे. पावसाळा दरवर्षी ७ जूनला येणारच, अशी जी अटकळ होती, ती कधीचीच संपली आहे. ७ जून ही आता पावसाच्या आगमनाची नक्की तारीख नसली तरी या महिन्याच्या दुसऱ्या- तिसऱ्या आठवड्यात तो बरसतोच! यंदा मात्र त्याने खूपच विश्रांती घेतली आहे.जूनचा तिसरा आठवडा लागला तरी, मान्सूनच्या पावसाचा विदर्भात पत्ता नाही. कागदोपत्री मान्सून विदर्भात आला. देशात त्याचे आगमन यंदा नेहमीप्रमाणे केरळातून न होता विदर्भातून झाले आहे, असे हवामान खाते म्हणते. मात्र, विदर्भात तसे काही चित्र नाही. निदान चंद्रपूर जिल्ह्यात तरी तो आला नाही. २३ तारीख उलटून गेली तरी त्याचा पत्ता नाही आणि तो पुढे कधी बरसणार याचा नेमका अंदाजही नाही. सन २००५ ला पाऊस लांबल्याने अशीच स्थिती निर्माण झाली होती. जून २४ ची तारीख उजाडली तरी पाऊस नाही. कडक व घामेजून सोडणारे उन्ह पडत होते. सारे बेजार झाले होते. वर्धा नदीच्या पाण्याची धार तुटून नदीच्या पात्रात रेतीचे मैदान झाले होते. विहिरी आणि बोअरिंगच्या पाण्याची पातळी खूपच घसरली होती. वर्धा नदीवरुन जीवन प्राधिकरणाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीमधील खुल्या विहिरींजवळ पाण्याची धार पूर्णत: आटली होती. अशा बिकट स्थितीत, वर्धा नदीच्या मधोमध पेपर मिलच्या विहिरीतून पाणी जीवन प्राधिकरणाच्या विहिरीत सोडून त्याद्वारे शहराला नळातून कसा बसा पाणी पुरवठा होत होता. किल्ल्याजवळील, पेपर मिलच्या विहिरीची स्थिती अत्यंत वाईट झाली होती. पेपर मिलने नदीवर बंधारा बांधून पाणी अडवून ते पंपाने विहिरीकडे वळते केले होते. मात्र तेही पाणी संपून पेपर मिल बंद करण्याची पाळी आली होती. त्या काळी शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जाऊ लागला होता. त्याकरिता भांडणेही होवू लागली होती. यात उल्लेखनीय बाब अशी की, शहरातील बहुतेक सर्वच बोअरिंगच्या पाण्याची पातळी एवढी खाली गेली होती की त्यातून पाणी काढणे अवघड झाले होते. परंतु, नगर परिषद वाचनालयाजवळील बोअरिंग तशाही स्थितीत जमिनीतून मुबलक पाणी अव्याहतपणे देत होते. टँकरने या बोअरिंगद्वारेच पाणी पुरवठा होत होता. २४ जूनपर्यंत शहरात पेयजलाची अशीच स्थिती होती. साऱ्यांचे लक्ष, पाणी कधी येणार याकडे लागले होते. २४ जूनचे रात्रीला एकदाचा पाऊस लागला आणि तो सर्वत्र विदर्भभर एवढा बरसला की त्याच रात्रीला सकाळी तुटलेली पाण्याची धार पूर्ववत सुरु झाली. तीच स्थिती आज आलेली आहे. फरक एवढाच की २००५ ला नदीची पाण्याची धार तुटली होती. पाण्याचे दुर्भिक्ष शहरात निर्माण झाले होते. यंदा मात्र पाऊस लांबला असला तरी वर्धा नदीत बल्लारपूर भागात भरपूर पाणी आहे. जीवन प्राधिकरणाला नदीवरुन भरपूर पाणी पुरवठा होत आहे. खरा संकटात सापडला आहे, तो शेतकरी! त्याची झोपच उडाली आहे.
पाऊस लांबला; २००५ सारखीच स्थिती?
By admin | Updated: June 23, 2016 00:32 IST