बल्लारपूर : शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा (मजीप्रा)च्या वतीने सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. मागील तीन वर्षांपासून ७० करोडपेक्षा जास्त खर्च या योजनांवर करण्यात येत आहे. यानंतरही बल्लारपूरच्या जनतेस २४ तास पाणी मिळेल की नाही, याची शाश्वती सांगता येत नाही. कारण शहरात जिकडेतिकडे जलवाहिन्यांची गळती असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारा सुरू करण्यात आलेली नवीन १३ लाख लिटर क्षमतेची टाकी दीड तासातच खाली होत आहे.
त्या टाकीचे पाणी एवढ्या लवकर कुठे जाते, याचा शोध महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा घेत आहे. यामुळे रोज करोडो लिटर पाणी वाया जात आहे. अजूनही जुनी पाईपलाईन बंद करायला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना यश आलेले नाही. यामुळे जुन्या पाईपलाईनमधून पाणी वाया जाते. शहरात मुबलक पाणी मिळत नसल्यामुळे नळ ग्राहकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांवर असंतोष व्यक्त केला आहे. शुक्रवारी सेवासिंग पेट्रोलपंपासमोर पत्ता गोडाऊनजवळ ‘मजीप्रा’ची पाणी पाईप फुटून पाणी धो धो वाहत होते. मंजितसिंग कालरा यांनी सांगितले की मेनेवारच्या घराजवळ मागील एक महिन्यापासून फुटल्या पाईपमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु मजीप्राचे कर्मचारी चौकशी करायला तयार नाहीत. हे कर्मचारी पाण्याची कुठून गळती आहे, हेसुद्धा अधिकाऱ्याला सांगत नाहीत. याशिवाय पाणी समस्या घेऊन आम आदमी पार्टीचे रविकुमार पुप्पलवार यांनी मजीप्राला निवेदन दिले; तरी शहरात पाणीगळतीची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु दीड महिन्यापासून नव्या टाकीचे १३ लाख लिटर पाणी कुठे मुरत आहे, याचा थांगपत्ता अधिकाऱ्यांना लागत नाही.
कोट
सध्या कोविड साथीमुळे काही लोक बाधित आहेत व कामगारांच्या कमतरतेमुळे समस्या सुटण्यास वेळ लागत आहे. यामध्ये जनतेचे सहकार्य आवश्यक आहे; परंतु लिकेजच्या तक्रारी कोणीच करीत नाही.
- एस. बी. येरणे, अभियंता, मजीप्रा, बल्लारपूर