कंपनीचा दावा : नियंत्रणासाठी उत्पादनात घटचंद्रपूर : विजेची मागणी कमी असल्याने वीज निर्मिती नियंत्रित करण्यात येत आहे. कोणत्याही खाजगी कंपन्यांना झुकते माप न देता वीज संच बंद करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्या वीज निर्मिती तात्पुरत्या स्वरूपात कमी करण्यात आली असून त्याचा परिणाम महानिर्मिती व महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार नसल्याचा दावा महावितरण व महानिर्मिती कंपनीतर्फे करण्यात आला आहे.मीडियाकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनात दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे की, महावितरण व महानिर्मिती या दोन कंपन्यांमध्ये संपूर्ण औष्णिक वीज खरेदीबाबतचे दीर्घकालीन करार विद्युत नियामक आयोगाच्या संमतीने झालेले आहेत. हे सर्व करार २५ वर्षे कालावधीचे आहेत. हे करार कुठलल्याही प्रकारे मोडण्याचे अधिकार महानिर्मिती तसेच महावितरण कंपनीला नाहीत. म्हणून महानिर्मितीचे वीज निर्मिती संच कुठल्याही परिस्थितीत कायमचे बंद होणार नाहीत.वीज साठविता येत नसल्याने कमी मागणीच्या काळात योग्य फ्रिक्वेन्सी राखण्यासाठी विजेच्या मागणीनुसार सर्व वीज निर्मिती कंपन्यांना त्यांची वीज निर्मिती नियंत्रित करावी लागते. ही वीज निर्मिती नियंत्रित करणे कायद्याने आवश्यक आहे, अन्यथा तांत्रिक बिघाडापोटी पारेषण प्रणालीला धोका होऊन विद्युत पारेषण यंत्रणा ढासळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर वीज निर्मिती संच विजेच्या मागणीनुसार नियंत्रित करताना महानिर्मितीला किंवा केंद्रीय स्रोतांना, खाजगी स्रोतांना किंवा महावितरण कंपनीला कुठलाही अधिकार नसतो. वीज निर्मिती संच नियंत्रित करण्यासाठी विद्युत नियामक आयोगाने त्यांच्या आदेशान्वये ठरवून दिलेल्या ‘मोड’ प्रणालीनुसार राज्य भार प्रेषण केंद्राच्या माध्यमातून स्वतंत्रपणे व पारदर्शकरित्या उपलब्ध कमीत कमी दराची वीज खरेदी करण्यात येते.विजेची मागणी कमी झाल्यास या प्रणालीनुसार, ज्या वीज निर्मिती संचांचे अस्थिर आकार जास्त आहेत, ते वीज निर्मिती संच बंद करण्यात येतात. प्रत्येक वीज निर्मिती संचाच्या अस्थिर आकाराबाबतची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असते. काही तुरळक तांत्रिक अडचणी सोडल्यास सदर ‘मोड’ हे सर्वांना काही अपवाद वगळता लागू करणे बंधनकारक आहे.हे वीज निर्मिती संच ‘मोड’ प्रणालीनुसार विजेची मागणी कमी असलेल्या काळापुरते बंद करण्यात येतात. जसजशी विजेची मागणी वाढत जाते, त्याप्रमाणे हे वीज निर्मिती संच पुन्हा ‘मोड’ नुसार सुरू करण्यात येतात, असे सांगितले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अन्य काही राज्यातदेखील आता विजेच्या मागणीपेक्षा विजेची उपलब्धता जास्त असल्याने मागणी व पुरवठा यांच्यात ताळमेळ बसविणे जिकिरीचे होत आहे. ग्राहकांना विजेच्या बाजारात उपलब्ध असलेली स्वस्तात स्वस्त वीज द्यावी, असे निर्देश विद्युत नियामक आयोगाने दिलेले आहेत. तसेच वीज ग्राहकांची - ग्राहक संघटनांचीदेखील तशीच मागणी असल्याने महानिर्मितीचेसुद्धा काही संच नाईलाजाने बंद ठेवावे लागण्याचा परिस्थितीजन्य अप्रिय निर्णय सध्या घ्यावा लागत आहे.महावितरणची गेल्या पाच-सहा महिन्यांमधील विजेची मागणी वेगवेगळ्या कारणांमुळे अतिशय कमी झालेली आहे. त्या अनुषंगाने ‘मोड’नुसार महावितरण कंपनीबरोबर वीज निर्मितीच्या दीर्घकालीन करारांमधील सर्व स्रोतांकडून वीज कमी घेण्यात येत आहे. त्यामध्ये महानिर्मितीच्या भुसावळ, कोराडी, खापरखेडा येथील औष्णिक संचातून तसेच केंद्रीय स्रोतांमध्ये एनटीपीसीचे कावस, गंधार, मौदा व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या काही संचातून सध्या तात्पुरत्या कालावधीकरिता वीज घेण्यात आलेली नाही.सद्य: स्थितीत विजेची कमी झालेली मागणी ही तात्पुरत्या स्वरुपाची आहे, असेही महानिर्मितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)राजकीय पक्षांच्या अफवांमध्ये तथ्यांश नाहीभविष्यकाळात जसजशी विजेची मागणी वाढत जाईल तसतशी टप्प्याटप्प्याने ‘मोड’ नुसार महानिर्मितीचे वीज निर्मिती संच चालू करण्यात येतील. त्यामुळे खाजगी वीज उत्पादकांना कोणत्याही प्रकारचे झुकते माप वा लाभ देण्याचा हेतू नाही हे स्पष्ट करण्यात येते. व काही राजकीय पक्षांनी याबाबत पसरविलेल्या अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. संच सध्या बंद असले तरीही त्यामुळे महानिर्मितीचे कोणतेही अधिकारी, कर्मचारी व कामगार कामावरून कमी होणार नाहीत,
महानिर्मितीचे संच बंद होणार नाही
By admin | Updated: August 13, 2016 00:26 IST