चंद्रपूर: स्वत:जवळ अवैधरित्या गांजा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या आरोपीला येथील तदर्थ अतिरिक्त सत्र न्यायाधिश के.एल.व्यास यांनी पाच वर्षे सक्त मजुरीसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विलास रामचंद्र किनेकार असे आरोपीचे नाव असून तो स्थानिक रयतवारी कॉलरीतील रहिवासी आहे. १५ डिसेंबर २०१३ रोजी रामनगर पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे विलास किनेकार याच्या घरी धाड टाकून घराची झडती घेतली असता, स्वयंपाक खोलीतील ओट्याखाली एका पिप्यात १८ हजार १०० रुपये किंमतीचा तीन किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी विलास किनेकर याच्याविरूद्ध कलम २० (ब) एन.डी.पी.एस.अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक खंडेराव पिटलेवाड यांनी करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान, न्या. के.एल.व्यास यांनी आरोपी विलास किनेकर याला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व ३० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास त्याला सहा महिने शिक्षा भोगावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
गांजा विक्रेत्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By admin | Updated: May 13, 2016 01:02 IST