गडचांदूर: गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. परंतु, रस्त्यांची दुरवस्था झाली. त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रानडुकरांचा बंदोबस्त करावा
भद्रावती : काही दिवसांपासून काही गावातील शिवारात जंगली प्राण्यांनी शेतात धुमाकूळ सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेले पिकांचे प्राण्यांमुळे नुकसान होत आहे.
अवैध वाहतुकीला आळा घालावा
जिवती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसातच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
डासांचा प्रादुर्भाव
ब्रम्हपुरी: तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्वच्छता मोहीम गतिमान करावी
मूल : शहरात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. शिवाय, गांधी चौक आणि अन्य वॉर्डांतील चौकांतही रस्त्यावर वाहने ठेवण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. स्वच्छता व पार्किंगचा प्रश्न नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
पाणी पुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
बल्लारपूर : जिल्ह्यातील अनेक गावात पाणी पुरवठ्याची बोंब आहे. पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. पाणी पुरवठा योजना मंजूर असतानाही पाणी मिळत नसल्याने अनेक गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे. उन्हाळा सुरु असल्याने पाण्याची गरज जास्त आहे
शेतीपूरक योजना गावात पोहोचविण्याची गरज
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील जनता शेतीवरच अवलंबून आहे. दर वर्षीच अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. कृषी व अन्य विभागाच्या योजना गावात न आल्याने शेतकरी निराश आहेत.
अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
नांदा : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. अनेकजण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात.
खडसंगीत पाणी पुरवठा अवेळी
खडसंगी : मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र वेळी- अवेळी नळ सोडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी सकाळी पाणीपुरवठा केला जात होता. आता कधी सकाळी तर कधी सायंकाळी पाणी सोडले जात असल्याने अडचण जात आहे.
पोलीस पाटलांची रिक्त पदे भरावी
सावली : सर्वसामान्यांचे गावातच समस्यांचे निराकरण व्हावे, हा एकमेव हेतू समोर ठेवून शासनाने गावागावांत पोलीस पाटील पदाची निर्मिती केली. परंतु, तालुक्यातील अनेक गावातील पोलीस पाटलांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पोलीस पाटील पद तत्काळ भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.