कुणाला मिळणार लाभ? : अनेक शंकानी शेतकरी हैराणलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कर्जमाफीची सवलत फक्त पीक कर्जापुरतीच ठेवण्यात आली, तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाण्याची शक्यता आहे.चिमूर तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा बँकेनेही तालुक्यात लाखो रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. परंतु, शासनाने घातलेल्या जाचक अटीमुळे सामान्य शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दहा हजार रुपये कर्ज तातडीने देण्याच्या सूचना जिल्हा बँकांना देण्यात आल्या असल्या तरीही तालुक्यात एकाही शेतकऱ्याला याचा लाभ मिळालेला नाही. चिमूर तालुक्यात धान, कापूस, सोयाबीन असे संमिश्र पिकाचे उत्पादन घेतल्या जाते. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कपासीची व सोयाबीनची पेरणीही केली. परंतु, बी-बियाणे, खत औषधे आणि मजुरांना पैसे उपलब्ध झाले नाहीत तर शेतकऱ्यांना याचा फायदा काय, असा सवाल विचारला जात आहे.शासनाची कर्जमाफी आणि दहा हजाराची तातडीची कर्ज स्वरूपी मदत ही निकषात अडकली तर संपासारखे तीव्र आंदोलन करूनही हाती काय लागले, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. शासनाचे शेती निकष हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बाबतीत अडचणीचे ठरणारे असून त्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.दुसरीकडे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत:हून कर्जमाफी नाकारण्याची गरज आहे. परंतु, चिमूर तालुक्यात अद्याप, असा एकही शेतकरी पुढे आलेला नाही. तालुक्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, मोठे क्षेत्र असणारे शेतकरीही कमी नाहीत. ते प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा कापूस, सोयाबीनचे उत्पन्न मिळवितात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा मिळणे आवश्यक असेल तर धनदांडग्या शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढे येत शासनाची कर्जमाफी नाकारणे गरजेचे आहे. मात्र सध्या शेतकरी संभ्रमात आहेत. निकषांकडे लक्षशेतकऱ्यांच्या संपाचा धसका घेत शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला तर या कर्ज माफीसाठी वेळ लागला म्हणून खरीपाच्या पेरणीसाठी दहा हजार रूपये कर्जरूपी रक्कम देण्याची घोषणा शासनाने केली. त्यासाठी शासनाचे निकष, अटी काय आहेत, याची माहिती शेतकऱ्यांना अजुनही नाही. तर जिल्हा सहकारी बँकाही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देण्यास नकार देत असल्याचा प्रकार सुरू आहे. यासाठी काही शेतकऱ्यांनी अटी व शर्ती आणि निकष कशाला, असे मत व्यक्त करीत आहेत. तरी पण शेतकऱ्यांनी कर्जमाफी व दहा हजार रुपये मदतीसाठी निकषाकडे लक्ष ठेवून आहेत.
कर्ज माफीबद्दल शेतकऱ्यांत संभ्रम
By admin | Updated: June 21, 2017 00:46 IST