सावली : विधानसभा निवडणुकी दरम्यान राजकीय वातावरण उमेदवारासह कार्यकर्तेही गरम होते. मतदानाच्या दिवशी पैसा, दारू आणि मटन या त्रिसुत्रीचा अवलंब झाल्याने विरोधी आणि राष्ट्रीय पार्टीच्या कार्यकर्त्यात हाणामारी झाल्याने तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.सावली पोलीस ठाण्यातंर्गत येत असलेल्या कापसी येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास मतदानाच्या दिवशी ही घटना घडली. अटक करण्यात आलेल्यामध्ये मंगला मारोती शेंडे (३६), विद्या राजेंद्र बोरकर (४०), दिवाकर लक्ष्मण मेश्राम (४९) रा. कापसी या तीन भाजपा कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अटकेतील तिघांचा वर्षा सिद्धार्थ खोब्रागडे (२९) रा. कापसी यांच्याशी प्रचारावरुन वाद झाला. वाद वाढल्याने हाणामारी झाली. यात वर्षा खोब्रागडे यांच्या पतीलाही मारहान केली. याप्रकरणी वर्षा खोब्रागडे यांनी सावली पोलिसात तक्रार दाखल करताच फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी विरूद्ध पोलिसांनी भादंवी ३७४, ३५४, ३४२, ३२३ (३४) कलमान्वये गुन्हा दाखल करुन तिघांनाही अटक केली. पुढील तपास सावलीचे ठाणेदार प्रमोद डोंगरे यांच्या मार्गदर्शनात मधुकर भाकरे, राष्ट्रपाल कातकर, दीपक नलावार करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोन गटांत हाणामारी; तिघांना अटक
By admin | Updated: October 18, 2014 01:19 IST