प्रोत्साहन देणे आवश्यक : पदाधिकाऱ्यांना दिले जावे प्रशिक्षणतळोधी(बा): नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. निकालही लागले, सरपंच पदावर सरपंच आरुढही झाले. यावेळच्या निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायती मध्ये जुने व नियमितपणे ग्रा.पं.मध्ये दिसणाऱ्या व्यक्तींना मतदारांनी बाजूला करीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. पण नवीन सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना शासकीय योजनांबाबत माहिती नसल्याने शासनाची ध्येय धोरणे, योजना काय, त्या कशा राबवायच्या याबाबत ते अनभिज्ञ आहेत. त्यांना सर्व गोष्टींची माहिती नसल्याने ते गावाचा विकासासाठी काहीच करू शकणार नाही. यासाठी ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.शासनाच्या विविध योजना खेड्यापर्यंत पोहचविण्याकरिता व राबविण्याकरिता प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते. पण या प्रशिक्षणाला गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शासनाच्या विविध योजना गावागावात पोहचविणे, त्यात सहभागी होणे, शासनाच्या योजनेत उत्कृष्ठ काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी लाखो रुपयाचे पुरस्कारही दिले जातात. या सर्व बाबींचा वापर करून घेतल्यास गावाच्या विकासासह लाखो रुपयाचे पुरस्कार प्राप्त करता येवू शकतात. ते कसे मिळवायचे याचे नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना ग्रामसेवकाला लेखी स्वरूपात पंचायत समितीकडून देण्यात येतात. या योजनांची माहिती अनेक गावात ग्रामसभेतून दिलीच जात नसल्याचे दिसते. सरपंच, ग्राम पंचायतीनाही ही माहिती पुरविली जात नाही, मोजक्या लोकांना ही माहिती देवून हे अधिकारी मोकळे होतात, अशी अनेक उदाहरणे ग्रामीण भागात दिसून येतात. यामुळे संपूर्ण गावाचे नुकसान होते.प्रशिक्षण माहिती, जनजागृती आदी कामे कृषी कार्यालय, वनविभाग, राजस्व विभाग कागदोपत्रीच राबवित असल्याचे दिसते. यामुळे गाव विकासाबाबत सरपंचासह, सदस्य व ग्रामस्थ अनभिज्ञच असतात. परिणामी गावाचा विकास होत नाही, यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत काही गावातील सरपंचासोबत संपर्क साधला असता त्यांनी प्रशिक्षणाची गरज व्यक्त केल्याने ही बाब गंभीरतेने घेणे गरजेचे झाले आहे, यावर जिल्हा प्रशासनाने विचार विनीमय करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)गावाचा विकास साधण्यासाठी कोणत्या योजना उपयोगी पडू शकतात, कोणती धोरणे राबविली गेली पाहिजे, याबाबत नियमित प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. यामुळे गावाचा विकास करता येईल, असे मत काही सरपंचानी व्यक्त केले. ग्रामविकासात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील गावांचा दौरा सरपंच, सदस्यांसाठी काढावा, अशा अभ्यास दौऱ्यांचा गावाच्या विकासासाठी लाभ होवू शकेल, अशीही काही जाणकार व्यक्तींची मते आहेत.शासनाच्या योजना लोकोपयोगी असतात, पण त्या पहिल्यांदा निवडून आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहितच नसतात. परिणामी त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी येतात. यामुळे शासनाने अधिकाऱ्यांना सुचना देवून ग्रामीण भागात मार्गदर्शन शिबिरे घेतली तर त्याचा उपयोग ग्रामस्थांसाठी करता येवू शकेल,- होमदेव मेश्राम, माजी सरपंच, ग्रामपंचायत वनली
योजनांबाबत ग्रा. प. पदाधिकारी अनभिज्ञ
By admin | Updated: October 31, 2015 02:04 IST