संग्रामपूर : काकनवाडा येथील वाण नदीपात्रातील रेती तस्करी बंद करुन कारवाई करावी, अशी मागणी सरपंच वेणुताई गजानन जाधव यांचेसह सहा ग्रा.पं. सदस्यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार यांचेकडे आज दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, गावाला लागूनच असलेल्या वाण नदीच्या पात्रातून दररोज शेकडो ब्रास रेती विनापरवानगी नेण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडल्याने गावात पुराचे पाणी घुसून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २ ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामस्थांनी अकोला जिल्ह्यातील दोन वाहने पकडली पण यावर अद्यापपर्यंत काहीच ठोस कारवाई झाली नाही. रॉयल्टीची कागदपत्र वानखेड घाटातील नावे असताना रेती मात्र काकनवाडा येथून नेणे सुरु आहे. हा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेने उघड झाला. मात्र महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. या परिसरातील रेती वाहतुकीमुळे महसूल विभागाचे लाखो रुपये नुकसान होत आहे. तरी या प्रकरणी कारवाई करावी, अन्यथा उपोषणाचा इशारा या ग्रा.पं. सदस्यांनी दिला आहे.
वाण नदीपात्रातील रेती तस्करी सुरुच
By admin | Updated: August 5, 2014 22:30 IST