उस्मानाबाद : भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका बसचालकासह शिक्षकाचा मृत्यू झाला़ अपघातातील मयत दोन्ही युवक सख्खे चुलतभाऊ आहेत़ हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास महावितरणच्या विश्रामगृहाजवळील महामार्गावर घडला़वडगाव सिध्देश्वर येथील बालाजी दत्तू वाडकर (वय-३८) हे राज्य परिवहन महामंडळात बसचालक म्हणून कार्यरत आहेत़ तर प्रमोद रामेश्वर वाडकर (वय-२९) हे लातूर येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ सख्खे चुलत भाऊ असलेले बालाजी वाडकर व प्रमोद वाडकर हे दोघे रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून गावाकडे जात होते़ त्यांची उस्मानाबाद- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील महावितरण कंपनीच्या विश्रामगृहाच्या नजीक आली असता पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील बसचालकासह शिक्षक जखमी झाला़ अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या वडगाव येथील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले़ जिल्हा रूग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोष केला़ (प्रतिनिधी)
अपघातात दोघे ठार
By admin | Updated: June 22, 2015 00:19 IST