नानासाहेब कांडलकर/जळगाव जामोदश्री गजानन महाराज शेगाव यांच्या जीवनकार्याचा महिमा वर्णन करणार्या संतकवी दासगणु महाराज लिखित ह्यश्री गजानन विजयह्ण ग्रंथाला शनिवारी ऋषीपंचमीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. एकूण २१ अध्याय असलेल्या या ग्रंथाची पहिली आवृत्ती, शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने, भाद्रपद शुध्द पंचमी शके १८६१ (ऋषीपंचमी), म्हणजेच १७ सप्टेंबर १९३९ रोजी प्रकाशित झाली होती. श्री दासगणू महाराजांची वाणी अत्यंत ओघवती असून, सर्वसाधारण जनसमुहाला सहज समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. श्री दासगणू महाराज हे श्री साईबाबांचे भक्त होते. त्यांनी साईंच्या मुखातून श्री गजानन महाराजांचे नाव अनेकदा ऐकले होते. साईबाबा गजानन महाराजांना सख्खे भाऊ मानत. मे १९0७ मध्ये साईबाबांच्या आट्ठोवरून दासगणू अकोटला जाण्यासाठी निघाले असता, एका खेडेगावी ओढय़ाच्या काठावर त्यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्या दर्शनाची महती पुढे तब्बल ३२ वर्षांनी १९३९ मध्ये ह्यश्री गजानन विजयह्ण ग्रंथाच्या रुपाने प्रकट झाली. गजानन महाराज संस्थानचे तत्कालीन व्यवस्थापक रावसाहेब रामचंद्र कृष्णाजी पाटील यांनी पंढरपूर येथे दामोदर आश्रमात दासगुण महाराजांची भेट घेतली आणि यांना श्री गजानन महाराज यांच्या लिला चरित्रावर काव्यरूपी ग्रंथ लिहिण्याची विनंती केली. त्यानंतर दासगणू महाराज शेगाव येथे आले व त्यांनी दररोज एक याप्रमाणे २१ दिवसात २१ अध्याय त्यांच्या प्रासादिक वाणीतून सांगितले. त्यांचे लेखन छगनभाऊ बारटक्के यांच्यासह रतनसा सोनवणे दिवाणजी व उकर्डा गणगणे यांनी केले. ग्रंथ शके १८६१ मध्ये लिहून पूर्ण झाला. याबाबत एकविसाव्या अध्यायात शेवटी असा उल्लेख आहे की, शके अठराशे एकसष्टांत, प्रमाथिनाम संवत्सरांत, चैत्रमासी शुध्दांत, वर्षप्रतिपदेला, हा ग्रंथ कळसा गेला, शेगाव नामे ग्रामी भला, तो गजाननांनी पूर्ण केला, प्रथम प्रहरी बुधवारीह्ण. दिवसभरात विजय ग्रंथाचा एक अध्याय लिहून पूर्ण झाल्यानंतर, दासगणू महाराज रात्री सर्व भक्तांना त्याचे वाचन करून दाखवित असत.श्री गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक, श्री गजानन महाराज संस्थानचे तत्कालीन व्यवस्थापक रावसाहेब रामचंद्र कृष्णाजी पाटील हे होते. संपादन पुणे येथील विठ्ठल लक्ष्मण सुबंध यांनी केले होते. त्यावेळी गं्रथाच्या साध्या प्रतीची किंमत एक रूपया, कापडी पतीची किंमत सव्वा रूपया व रेशमी प्रतीची किंमत दीड रूपया होती. पुढे श्री गजानन महाराज संजीवन समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने श्री गजानन विजय ग्रंथाची विशेष आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. त्या आवृत्तीचे प्रकाशक, श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त, कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील हे आहेत. ग्रंथाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्थानच्यावतीने पुन्हा एका विशेष आवृत्तीचे प्रकाशन होत असल्याची माहिती आहे.*४६ आवृत्त्या, २३ लाख प्रतींची विक्रीश्री गजानन विजय ग्रंथाच्या आतापर्यंत ४६ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, २२ लाख ९७ हजार प्रतींची विक्री झाली आहे. मराठी भाषेसह हिंदी, तेलगू, गुजराथी, इंग्रजी व कानडी या भाषांमध्येही या गं्रथाच्या आवृत्या आहेत. मराठीमध्ये लघु, सुलभ व विशेष आवृत्तीमधून २१ लाख ८२ हजार ग्रंथ विक्री झाली, तर अन्य भाषांमधील ग्रंथांच्या १ लाख १५ हजार प्रती विकल्या गेल्या आहेत.
श्री गजानन विजय ग्रंथाची आज पंचाहत्तरी!
By admin | Updated: August 30, 2014 00:11 IST