खामगाव : जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपी युवकास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा २७ ऑगस्ट रोजी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली.जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील आठ वर्षीय बालिकेवर ७ जानेवारी २0१३ रोजी प्रवीण रामकृष्ण थोरात वय १८ या युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या आईने जळगाव पोलिस स्टेशनमध्ये दिल्यावरून आरोपी प्रवीण रामकृष्ण थोरात याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (२) (फ), सह कलम ४,८ बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम सन २0१२ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. दरम्यान, या प्रकरणात पीडित मुलगीसह आठ जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. यामध्ये प्रवीण थोरात विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास तीन वर्षांचा सश्रम कारावास व ५00 रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास ३ महिन्याची शिक्षा तसेच कलम ५0६ मध्ये ६ महिने शिक्षा व ५00 रुपये दंड या दोन्ही शिक्षा एकाच वेळेस भोगावयाच्या आहेत. पीडित मुलीस मदत म्हणून ५00 रुपये आरोपीने द्यावे, असे न्यायालयाने नमूद केले. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एम.अग्रवाल यांनी दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अभियोक्ता म्हणून अँड.राजेश्वरी आळशी यांनी काम पाहिले.
लैंगिक शोषणप्रकरणी एकास सश्रम कारावास
By admin | Updated: August 28, 2014 00:49 IST