खामगाव: स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या दोन उपोषणांकडे प्रशासकीय अधिकार्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अधिकार्यांपाठोपाठ राजकीय पदाधिकार्यांनीही उपोषणांना बेदखल केल्याने उपोषणकर्त्यां वृध्द महिलेची चवथ्या दिवशी प्रकृती खालावली आहे. शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जनुना येथील चंद्रभान झिंगराजी शेजव आणि त्यांच्या वयोवृध्द पत्नी शांताबाई शेजव यांनी एक ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हक्क सोडण्याचा लेख लिहून घेण्यासोबतच सात-बारामधून नाव कमी केल्याबाबत शेजव यांनी सपत्नीक बेमुदत उपोषण सुरू केले आहे.मात्र, पत्नीची प्रकृती खालावल्यामुळे चंद्रभान शेजव हतबल झाले आहेत. याशिवाय जनुना येथीलच मिरा नगरातील नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या अन्याविरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.गेल्या चार दिवसांपासून या उपोषणाकडेही प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकार्यांचे दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायतीकडून रहिवासी दाखले दिल्या जात नाही, तसेच इतर समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली जात असल्याने युसुफ खान, सुभाष इंगळे, सागर यादव, चिंतामण कटारे, सुनिता यादव, वंदना मोरे, रामा मोरे, सुनिल पाठक, भिमराव बशीरे, रेखा बशीरे, सिंधू तराळे, प्रमिला पाठक, कविता शेटे, गणेश शेटे, बाळकृष्ण इंगळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाकडे अधिकार्यांची पाठ
By admin | Updated: August 5, 2014 01:21 IST