मोताळा : तालुक्यातील गोतमारा गावात आजही मानाच्या बैलावरून झालेल्या वादामुळे गेल्या ३५ वर्षांंपासून चार ठिकाणी पोळा भरतो. विशेष म्हणजे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव तंटामुक्त आहे. तरीही चार ठिकाणी पोळा भरविण्याची ही पद्धत अद्याप सुरूच आहे. गोतमारा या गावात तसेच लगतच्या तांड्यामध्ये बंजारा, कोळी व लोधी समाजाचे लोक राहतात. या गावातील हनुमान मंदिरासमोरील प्रांगणात तांड्यातील गोतमारा, बंजारा, कोळी व लोधी समाजातर्फे एकत्रितपणे पोळा भरविला जात होता. सणाच्या दिवशी वाद होऊ नये म्हणून गावातील ज्येष्ठ मंडळी व समाजबांधवांनी चर्चा केली होती. त्यानुसार, दरवर्षी एका समाजाच्या व्यक्तीच्या बैलाला तोरणाखालून जाण्याचा मान मिळत असे; मात्र ३५ वर्षांपूर्वी या सणाच्या दिवशी मानाच्या बैलावरून वाद निर्माण झाला व वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. त्यानंतर सर्व समाजाच्या वतीने हनुमान मंदिरासमोरील पोळा भरविण्याची परंपरा बंद झाली. गावात पुन्हा वाद होऊ नये, यासाठी प्रत्येक समाजाने आपापल्या परिसरात वेगवेगळा पोळा साजरा करण्याची परंपरा सुरू झाली, ती आजतागायत सुरू आहे. * विशेष म्हणजे, गोतमारा गाव तंटामुक्त असून, गावाला दोन लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. असे असले तरी गेल्या कित्येक वर्षांपासून एकत्रितपणे भरविला जाणार्या पोळय़ाचा सण गावकरी आजही वेगवेगळा साजरा करतात. यामध्ये कोळी बांधवांच्या वतीने हनुमान मंदिरासमोर, बंजारा समाजाच्या वतीने गावातील चौकामध्ये, लोधी समाजाच्या वतीने दुसर्या हनुमान मंदिरासमोर, तर गोतमारा तांड्यामध्ये गावालगत असा चार ठिकाणी पोळा साजरा केला जातो.
एकाच गावात चार ठिकाणी पोळा
By admin | Updated: August 25, 2014 01:56 IST