बुलडाणा : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण आहे. पावसाळा सुरू होऊन ३५ दिवस झाले असले तरी आतापर्यंत सरासरी एक आठवडा पाऊस झाला. त्यानंतर २0 जूनपासून १५ दिवसांत पावसाचा खंड आहे. त्याच्या परिणामी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम प्रकल्प व ७४ लघु प्रकल्पांमधील पाणीसाठा हा वाढत्या तापमानामुळे कमी होत आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला. त्यानंतर कमी-जास्त प्रमाणात आठवडाभर पाऊस कोसळला. २0 जूननंतर आतापर्यंत पावसाने दडी मारली आहे. १३ जूननंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठय़ात नगण्य वाढ झाली. ही वाढ तेवढय़ाच झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठय़ा प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी २३.१६ टक्के जलसाठा होता. आता ३२.९९ टक्के जलसाठा आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी २0.५२ टक्के जलसाठा होता. आता २४.४४ टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात ७४ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये एका महिन्यापूर्वी ७.९१ टक्के जलसाठा होता. आता ९.१३ टक्के जलसाठा झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या पाणीसाठय़ाची जी स्थिती होती, त्यात नगण्य वाढ झाली आहे. तथापि, तापमान कमी झालेले नसल्याने व पावसाचा खंड वाढल्यास या प्रकल्पातील पाणीसाठा तळ गाठण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत १६.२४ दलघमी जलसाठा आहे. ही टक्केवारी २३.४३ आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी साठय़ाच्या तुलनेत १४.0६ दलघमी जलसाठा आहे. ही २३.६0 टक्केवारी आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ५0.0३ दलघमी जलसाठा आहे. ही ४३.६४ टक्केवारी आहे. पावसाने दडी मारल्याने व तापमानामुळे हा जलसाठा कमी-कमी होत आहे.
*चक्रीवादळामुळे मान्सूनला धोका
प्रशांत महासागरात निर्माण होणारी चक्रीवादळे मान्सूनला मोठा धोका निर्माण करीत आहेत. सध्या प्रशांत महासागरात मोठय़ा प्रमाणावर उलथापालथ होत आहे. या ठिकाणी टेन नावाचे वादळ आणि चान होम नावाचे चक्रीवादळ सक्रिय आहे. यामुळे भारतीय मान्सून माघारला आहे. ह्यचानहोमच्याच नंतर नांगका हे वादळ सक्रिय आहे. ही वादळे भारतीय उपखंडातील वार्याची दिशा व लयबद्धतेमुळे विस्कळीतपणा निर्माण करतात. त्यामुळे नैऋत्य मान्सून कमजोर झाला असल्याचे दिसते.
*जिल्ह्यात पावसाची सद्यस्थिती
जिल्ह्यात १ जून ते ६ जुलै दरम्यान १८१.0 मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना १६0.0 मि.मी. पाऊस पडला आहे. ही सरासरी ६४.0८ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत २७.८ मि.मी. पाऊस पडला होता.