खामगाव : गेल्या सभेचे प्रोसेडींग (कार्यवृत्त)न लिहीताच पुन्हा पालिकेत सभा बोलाविण्यात आल्याचा संताप व्यक्त करीत विरोधकांनी पालिकेच्या सभेत आज चांगलाच गदारोळ घातला. विषय पत्रिकेवरील पाच विषयांवर विरोधकांनी सत्ताधार्यांना कोंडीत धरले. तथापि, सभा नियमानुसार असल्याचा दावा करीत सत्ताधार्यांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा शनिवारी सकाळी ११ वाजता पार पडली. या सभेत विषय सुचीतील पहिला विषय मागील सभेचे इतवृत्त कायम करणे हा असताना काल सायंकाळपर्यंत सुध्दा प्रोसेडींग लिहीले नसल्याचा आरोप शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी करीत आजची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज प्रत्यक्ष सभेला सुरूवात झाल्यानंतर प्रोसेडींग बुक उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत सत्ताधार्यांना धारेवर धरले. यावेळी महाराष्ट्र वित्त आयोग मुदत क्र.१ ते १0 ची माहिती सादर करण्यास मान्यता देणे असा विषय असताना ही माहिती अगोदरच दिली गेल्याचे व नंतर ठराव आणल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. या शिवाय सार्वजनिक पथदिवे देखभाल दुरूस्तीचा ठेका देणे, सन २0१४-१५ करीता कचरा उचलण्याचा ठेका देणे, आदी विषयावर विरोधकांनी संताप व्यक्त करत जोरदार आक्षेप नोंदविला. यामध्ये निविदा प्रक्रियेत छेडछाड करून नियमबाह्य कामे करण्यात आली असून याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार सुध्दा करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
खामगाव पालिकेच्या सभेत गदारोळ
By admin | Updated: August 24, 2014 00:56 IST