यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने परिसरातील सर्वात लहान मोठे जलस्रोत पाण्याने तुडुंब भरले होते. याचा परिणाम म्हणून यंदाच्या रब्बी फेऱ्यात दुपटीने वाढ झाली. शेतकऱ्यांनी गहू, हरबरा, ज्वारी, मका, कांदा आदी पिकांची पेरणी केलेली आहे. पिकांना मुबलक पाणी असल्याने पिके चांगली आली होती. मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाची मळणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पेरणी उशिराने केली अशा शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही शेकडो हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी आदी पिके आहेत. हवामान खात्याने मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार काही दिवसांपासून वातावरणदेखील बदल झाल्याने शेतकऱ्यांना धास्ती लागली होती. दरम्यान, शुक्रवारी अचानक झालेल्या वादळवाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मासरूळ, डोमरूळ, धामणगाव, वरुड, सोयगाव, पांगरखेड, महाड, तराडखेड, गुम्मी या परिसरातील अनेक घरावरील पत्रे उडून गेल्याने संसारोपयोगी साहित्य पाण्यात भिजल्याने नुकसान झाले. शेतकऱ्यांनी शेतात जमा करून ठेवलेल्या हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. शुक्रवार व शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे द्यावे व शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य दिलीप नामदेव सिनकर यांनी केली आहे.
लवकरात लवकर झालेल्या नुकसानाचा प्राथमिक सर्व्हे करण्यात येईल. त्यानंतर शासनस्तरावर याचा प्रस्ताव दाखल करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देऊ.
डी. एम. मेरत, तालुका कृषी अधिकारी, बुलडाणा.