विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. २६- केवळ साहित्य व साहित्यिकांचा उदोउदो करणे, कविता आणि गप्पांचे फड रचने, एवढीच जबाबदारी या संमेलनाची नाही. ग्रामीण भागात साहित्य संमेलन आयोजित करण्यामागील उद्देश व्यापक असून, आत्मविश्वास गमावलेल्या साहित्यिकांमध्ये आत्मसन्मान निर्माण करण्याचे कार्य संमेलनातून व्हायला हवे, असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शेलसूर यांच्या सुवर्ण मोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूर आणि विदर्भ साहित्य संघ शाखा बुलडाणाच्या संयुक्त विद्यमाने करवंड येथील स्व. माधवराव देशमुख माध्यमिक आश्रमशाळेत एक दिवसीय जिल्हा मराठी संमेलन २६ मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध गजलकार डॉ. गणेश गायकवाड, चिखलीचे आ. राहुल बोंद्रे, स्वागताध्यक्ष तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष प्रा. सुनील देशमुख, महामंडळाचे अध्यक्ष चिंतामण देशपांडे, डॉ. विलास मानेकर, प्रदीप गोते, संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार, प्रा. डॉ. अनंत शिरसाट, प्रा. गोविंद गायकी, बारोमासकार सदानंद देशमुख, जि. प. सदस्य जयश्री शेळके, करवंडचे सरपंच जगन्नाथ देशमुख, संमेलनाचे कार्यवाह गणेश निकम यांच्यासह संमेलन आयोजन समितीचे पदाधिकारी व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, की कोणतेही भाषा शुद्ध-अशुद्ध नसते, तर प्रत्येक बोलीभाषा ही पवित्र असून, महाराष्ट्रातील बहुजन जे बोलीभाषा बोलतात तीच खरी मराठी भाषा आहे. परंतु बोलीला अद्याप भाषा म्हणून मान्यता मिळालेली नाही. मराठी भाषा जगवायची असेल, तर समाजाने आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. शहरात बसून मराठीच्या नावाने गळा काढणारे दुटप्पी आहेत. भाषिक प्रदूषण शहरात असून, मराठी भाषा ग्रामीण भागातच जिवंत ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. अनंत शिरसाठ यांनी, तर संचालन चंद्रशेखर जोशी यांनी आणि स्वागत समारंभ व प्रकाशन सोहळ्याचे संचालन संमेलनाचे संयोजक नरेंद्र लांजेवार यांनी केले. आभार पंजाबराव गायकवाड यांनी मानले. या मराठी संमेलनासाठी जिल्हाभरातून साहित्यिक, लेखक, कवी पंचक्रोशीतील गावकरी, पत्रकार तथा हजारो रसिकांची उपस्थिती होती.मराठी भाषेचे 'बजेट' चौकाचौकांत जाळायला हवे! मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारने १७ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. यातील सात-आठ कोटी राज्यात फिरण्यासाठीच खर्च होतात. उर्वरित रकमेत मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन कसे करणार? राज्य सरकार मराठी भाषेची थट्टा करत असल्याचा आरोप करत डॉ. जोशी यांनी केला असून, हे बजेट चौकाचौकांत जाळले पाहिजे अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली. साहित्य संमेलन न म्हणता मराठी संमेलन म्हणा!आजची संमेलनं साहित्यकेंद्री झाली आहेत. या संमेलनातून भाषा, बोली, संस्कृती बाजूला पडते. त्यामुळे या संमेलनाचं समाजशीलतेशी, मराठी भाषेच्या संस्कृतीशी नातं तुटलं आहे. परिणामी लोक संमेलनांकडे पाठ फिरवतात. त्यामुळे संमेलने व्यापक करण्यासाठी करवंड येथील संमेलनाला साहित्य संमेलन न म्हणता जिल्हा मराठी संमेलन म्हटले असल्याचा खुलासाही जोशी यांनी केला. मराठी भाषेपुढे सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी भाषक अस्मितेचा उद्रेक दाखवल्याशिवाय मराठीच्या संवर्धनासाठी पावले उचलली जाणार नाहीत, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.
आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी संमेलन!
By admin | Updated: March 27, 2017 02:31 IST