शेगाव: वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे सध्या बालके विविध आजाराने त्रस्त झाली असून, शहरातील बाल रूग्णालयात विविध आजाराच्या रूग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अधूनमधून अवकाळी पाऊसही कोसळत आहे. वातावरणातील याच बदलाचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे. उन्हाचे चटके जाणवत असल्याने बालकांना कांजण्या, गोवर (चिकनपॉक्स)नावाचे आजार होत आहेत. उन्हाच्या तीव्रतेसोबत या आजाराचे चटकेही अधिक जाणवतात. या आजारामुळे बालकाच्या शरीरात प्रचंड आग पडते. वातावरणातील या बदलामुळे डासांचा उपद्रव वाढल्यानेही अनेकांना थंडी, ताप यासारखे आजार होत आहेत. सध्या बहुतांश बालकांमध्ये गोवर, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब यासारखे आजार दिसून येत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ.मोहन बानोले यांनी सांगितले. दरम्यान, उन्हाच्या तीव्रतेमुळे बालकांना डायरिया, कांजण्या, गोवर, व्हायरल फिव्हर, तांबड्या पेशी कमी होणे, मलेरिया आदी आजार बळावू शकतात. यातच बालकांच्या शरीरातील पाणी कमी झाल्यास उष्माघाताचा धोकाही संभवू शकतो. त्यासाठी बालकांमध्ये कुठलाही आजार आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत, असे आवाहन उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हाभरातील अनेक रुग्णालयांमध्ये असे दृष्य आढळून येते.
साथीच्या आजारांनी बालके त्रस्त
By admin | Updated: May 12, 2014 22:51 IST