चिखली ते जालना या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणातून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु महामार्गाअंतर्गत ज्या-ज्या ठिकाणी वनविभागाचे क्षेत्र आहे त्या-त्या ठिकाणी संबंधित विभागाने रस्ता कामास मान्यता दिलेली नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडलेले आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत राहेरी पुलावरून जड वाहतूक बंद असल्याने त्या मार्गावरील सर्व जडवाहतूक जालना-चिखली मार्गे मेहकर अशा पद्धतीने सुरू असल्याने प्रचंड प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे. वन विभागाने अडविलेल्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून, त्या रस्त्याची अत्यंत खस्ता हालत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पृष्ठभूमीवर माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी वने, भूखंड पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांची मंत्रालयात भेट घेऊन या महामार्गावर वनक्षेत्र असलेल्या ठिकाणी वनविभागाने अडविलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी व महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्णत्वास नेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
चिखली-जालना महामार्गातील वनक्षेत्रातील कामास मान्यता द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST