खामगाव : तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा सर्व्हे थंडबस्त्यात असल्याचे चित्र आहे. शासन दप्तरी तालुक्यातील मृत जनावरांचा आकडा १४0 च्यावर पोहोचलाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे खामगाव तालुक्यातील हिवरखेड, कोन्टी, मांडणी, पोरज, कोक्ता माक्ता, गेरू आदी गावातील जनावरे मृत्युमुखी पडल्याचे सत्र सुरू आहे. तसेच तालुक्यातील अनेक गावात जनावरे आजारी असल्याचे प्रमाण मोठे आहे. तालुक्यातील अडीचशेच्यावर जनावरे मृत्युमुखी पडल्यानंतरही महसूल विभागाकडे याबाबत माहिती पोहोचलेली नव्हती. दरम्यान, लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी महसूल प्रशासनाच्यावतीने घटनास्थळी तहसीलदार टेंभरे यांनी भेट दिली. तसेच याबाबतचा अहवाल मागितला. त्यामुळे पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडून तसेच तलाठय़ांकडून १४0 जनावरे मृत्युमुखी पडल्याचा अहवाल तहसील कार्यालयास सादर करण्यात आला. अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आला आहे; मात्र या व्यतिरिक्तही अनेक गावातील जनावरे मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडली आहेत; मात्र संबंधित तलाठी यांच्याकडून तहसील कार्यालयास याबाबत कळविण्यात आले नाही. त्यामुळे शासन दरबारी मृत जनावरांचा आकडा १४0 च्यावर पोहोचला नसल्याची माहिती आहे. *प्रशासनाने सादर केलेला आकडा एकाच गावातील!तालुक्यातील १४0 जनावरे मृत्युमुखी पडल्याचा अहवाल महसूल प्रशासनाने वरिष्ठांना सादर केला आहे; मात्र हा आकडा तालुक्यातील केवळ हिवरखेड गावातील असून कोन्टी, मांडणी, पोरज, गेरू, माक्ता कोक्ता या गावांची शासन दप्तरी कोणतीही नोंद घेण्यात आली नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. *लोकमतने उघडकीस आणले वास्तव!नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना सर्वप्रथम लोकमतने प्रकाशझोतात आणली. तालुक्यातील हिवरखेड येथील शंभरावर जनावरे मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक वास्तव प्रकाशित केल्यानंतर तालुक्यातील इतर गावातील जनावरे मृत्युमुखी पडल्याची सविस्तर आकडेवारीही प्रकाशित केली; मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तालुक्यातील गरीब पशुपालकांवर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे.
मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा सर्व्हे थंडबस्त्यात!
By admin | Updated: August 1, 2014 02:22 IST