चिखली : स्थानिक तालुका क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या वै.भिमराव अण्णा इंगळे नगरामध्ये गेल्या आठ दिवसापासुन संजय चेके पाटील यांच्या पुढाकारातुन भारतमाता सेवा समिती आणि चेकेपाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकारातुन सुरु असलेल्या श्रीरामकथा आणि हरीनाम सप्ताहाचा समारोप हभप प्रकाशबुवा जवंजाळ यांच्या काल्याचे किर्तनाने संपन्न झाला. यावेळी आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास एक लाखांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कदचित या परीसरातील महाप्रसादाच्या गर्दीचा विक्रम ठरावा असे मत अनेकांनी यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या महाप्रसादाच्या आयोजनासाठी भारतमाता सेवा समिती आणि चेकेपाटील फाउंडेशन यांच्या वतीने सुमारे ४१ क्विंंटल पिठाचे वाटप महिला भाविकांना पोळ्या टाकून आणण्यासाठी करण्यात आलेले होते, मात्र बुधवारी सकाळपासून समितीकडे शहरातीलच नव्हे तर आजुबाजुच्या अनेक खेड्यातील हजारो महिला भाविकांनी आपल्या घरचेच पीठ वापरुन पोळ्या समितीकडे आणून दिल्या. तालुक्यातील शिंदी हराळी, शेलुद, पळसखेड जयंती, सोमठाणा, दिवठाणा, खंडाळा मकरध्वज, शेलगांव जहांगीर, बेराळा, मालगणी, हातणी आणि परीसरातील अनेक गावातील महिलांसह शहरातील अनेक भाविक महिलांनी पोळ्या करुन देण्यामध्ये आपले योगदान दिले. समितीच्या वतीने भाविकांसाठी मोठय़ा प्रमाणात महाप्रसादाच्या स्वरुपात अन्नदान होत असतांना आपलाही त्यामध्ये खारीचा वाटा असावा या हेतुने स्वखर्चाने पोळ्या समितीकडे जमा केल्या. जाणकारांनी दिलेल्या माहीतीनुसार ज्या महिलांनी पिठ नेले नाही मात्र स्वखर्चाने पोळ्या आणुन दिल्या अश्या महिलाकडुन आलेल्या पोळ्या सुमारे १0 क्विंंटलच्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला. समितीच्या वतीने सुमारे ४0 क्विंंटल काशीफळाची भाजी आणि २0 क्विंंटल सामुग्रीचे बुंदीचे लाडु अश्या प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली होती. या महाप्रसादाचा परीसरातील लाखांवर भाविकांनी लाभ घेतला. समितीच्या वतीने पोळ्या टाकुन आणुन देणार्या प्रत्येक महिला भाविकांना ब्लाऊज पीस भेटस्वरुपात देण्यात आले. समितीच्या वतीने भाविकांसाठी शुध्द पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी सुमारे तीन लाख पाणी पाऊच पुरविण्यात आले होते. महाप्रसाद वाटप करण्यासाठी समितीच्या वतीने ५00 स्वंयसेवकांची फळी कार्यक्रमस्थळी तैनात करण्यात आली होती. संजय चेके पाटील यांच्या पुढाकारातुन भारतमाता सेवा समिती आणि चेकेपाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त पुढाकारातुन सुरु असलेल्या या संपुर्ण आठ दिवस सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताह आणि संगीत श्रीरामकथेच्या या भव्य आयोजनासाठी स्थानिक गजानन महाराज सेवा समिती, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ तालुका शाखा चिखली, गुरुदेव महिला सेवा समिती, विघ्नहर्ता गणेश मंडळ, जनसहारा मित्र मंडळ, अध्यात्म जागरण समुह, सुभाष बहुउद्देशीय संस्था, कल्पतरु पुस्तक पेढी, जय गणेश ग्रुप चिखली आणि निलकमल क्रीडा व गणेश मंडळ चिखली आदी संस्थांनी सहकार्य केले होते
१११ क्विंटल महाप्रसादाचे वाटप
By admin | Updated: August 7, 2014 22:07 IST