लाखांदूर : यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद न केल्याने तालुक्यातील बारव्हा व दिघोरी परिसरातील हजारो हेक्टर शेती सिंचित करण्याची क्षमता असलेल्या झरी उपसासिंचन योजना प्रकल्प पुन्हा एकदा रखडला असून लोकप्रतिनिधीची उदासीनता कारणीभूत असल्याचा ठपका शेतकऱ्यांनी ठेवला आहे.आंदोलन, उपोषणे व खणणी न करता केवळ राजकीय दृष्टीकोन बाळगुन भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून सिंचन क्षेत्र वाढविण्याचा कांगावा काही जनप्रतिनिधीं व लोकप्रतिनिधीकडून केला जात आहे. परंतु लाखांदूर तालुक्यातील बारव्हा व दिघोरी क्षेत्रातील हजारो हेक्टर शेतीची सिंचनाची व्यवस्था करणारा झरी सिंचन योजना मात्र निधीमुळे मागील २५ वर्षापासून रखडला आहे. दोन वर्षापुर्वी २२ एप्रिलच्या शासकीय पत्रानुसार या प्रकल्पाला २५ कोटी व त्यापेक्षा अधिक किंमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या सिंचन योजनेसाठी सदैव लढा देणारे चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी झरी तलावात निधी उपलब्ध झाल्याच्या कारणावरून फाटाक्यांची आतीस बाजी करून आनंद साजरा केला होता. परंतू माशी कुठे शिंकली कुणास ठावूक. निसर्गाचे पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे आनंदीत झाले होते. गेल्या २५ वर्षापासून इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात सोडून त्याभागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार होता. अनेक नेत्यांनी या प्रकल्पासाठी आंदोलने केली. रास्ता रोको केला. परंतु शासनाला दया आली नाही. झरी प्रकल्पामुळे २ हजार ५१५ हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली येणार असून प्रस्तावित प्रकल्पासाठी मसूदा तयार करण्यात आला होता. त्यात २३.२३ हेक्टर वनजमीन तर १५०.७६ हेक्टर खाजगी जमीन प्रभावित होणार आहे. प्रभावित वनजमिनीपैकी १९.३८ हेक्टर जागेत कालवे तयार करण्यासाठी उपयोगात येणार होती तर उर्वरित ३८५ हेक्टर वनजमीन उर्ध्वनलीका व तीन वितरण टाकीसाठी वापरण्यात येणार होत्या. त्यासाठी झरी, बोदरा, दिघोरी व सालेबर्डी तलाव पाणी वापर संस्थांनी देखील या योजनेला नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. एकंदरीत या प्रकल्पाचा प्राथमिक व दुय्यम स्तरावरील सर्व सोपस्कार पार पडले असताना शेवटच्या टप्प्याला अडचनीत निर्माण होताना दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
निधीअभावी झरी उपसा सिंचन प्रकल्प रखडला
By admin | Updated: August 5, 2014 23:21 IST