पालांदूर : शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार बदल घडवून आर्थिक उन्नती साधावी याकरिता पालांदूर सेवा सहकारी संस्था पुढे असते. भेंडीचे भरघोस उत्पन्न घेणाऱ्या मुखरु बुधाजी बागडे या शेतकऱ्याचा सन्मान करण्यात आला.पालांदूर परिसरात स्वतंत्र सिंचन व्यवस्था बऱ्यापैकी असल्याने बागायती शेती केली जाते. मात्र परंपरेचे पीक स्थानिक बाजारात विकले जाणारे घेत होते. यामुळे सर्वांचे पीक एकाचवेळी बाजारात आल्याने पिकाला भाव मिळत नसे. मात्र होतकरु शेतकऱ्यांनी मंडळ कृषी अधिकाऱ्यांमार्फत गटशेती साधून पाच शेतकऱ्यांनी भेंडी या भाजीपाला वर्गीय पिकाचे उत्पन्न घेतले. शेतात पिकणारी भेंडी जिल्हा बाजारातून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथे पाठविण्यात येत होती. या राज्यस्तरीय बाजारात भेंडीला २५-३० रुपये किलो भाव मिळाला. स्थानिक बाजारपेठेच्या दुप्पट, तिप्पट भाव मिळाल्याने नफ्यात वाढ झाली. पालांदूर परिसरात असा प्रयत्न मुखरु बागडे यांनी केला. भेंडीचे सरासरी ९० तोडे करुन प्रति एकरात १८,००० किलो भेंडीचे उत्पन्न घेण्यात आले. प्रति एकराला २ लक्ष रुपयाचे उत्पन्न मिळाले. यात १.२५ लाख निव्वळ नफा झाला. भेंडी पिकाच्या उत्पादनाकरिता कृषी मंडळ कार्यालय पालांदूर, आत्मा समितीचे सदस्य सुधीर धकाते, भाजीपाला व्यापारी बंडू बारापात्रे, कृषी पदवीधर शरद निखाडे, प्रशांत जांभुळकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. भेंडीचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने दुरवरुन शेतकरी बागडे यांच्या शेतावर अभ्यासाकरीता भेट देत आहेत. त्यांचा हा प्रयोग बरेच शेतकरी कृतीत उतरवीत आहेत. याची दखल घेत पालांदूर सेवा सहकारी संस्थेने मुखरु बागडे यांना आमसभेत सन्मानित केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दामाजी खंडाईत, पोलीस पाटील रमेश कापसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय कापसे, आत्माचे सदस्य सुधीर धकाते, बंडू बारापात्रे, संस्थेचे सदस्य आनंदराव हत्तीमारे, गटसचिव सुनील कापसे उपस्थित होते. (वार्ताहर)
भेंडीचे एकरी दोन लाखांचे उत्पन्न
By admin | Updated: July 27, 2014 23:34 IST