पहेला : ग्रामीण भागात तेंदू हंगाम सुरू होताच मजुरांना तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जीव मुठित धरून जावे लागते. काही ठिकाणी जंगलातील हिंस्त्र पशुंचा मजुरांवर हल्ला झाल्याने काहींना जीवसुद्धा गमवावा लागला आहे. या मजुरांना शासनाकडून अल्प प्रमाणात मोबदला मिळतो. त्यांचे कुटूंब उघड्यावर पडते. यासाठी या मजुरांना विमा लागू करण्याची मागणी मजुरांनी केली आहे.साधारणत: वर्षातून वीस ते पंचेवीस दिवस तेंदुपत्ता संकलनाचा व्यवसाय ग्रामीण भागात चालत असतो. तेंदूपत्ता संकलनाच्या व्यवसायाने शासनाला दरवर्षी कोट्यावधी रूपयांचा महसूल प्राप्त होतो. आता अवघ्या काही दिवसातच तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होणार आहे.परिसरात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गावोगावी केण फळी उघडण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना चांगला रोजगार मिळत असून नगदी कमाई होते. अल्प कालावधीच्या या कामाकरिता घरातील सर्वच सदस्य गुंतलेले असतात. रखरखत्या उन्हात जीवाची पर्वा न करता उन्हाचे चटके सहन करीत एकेक पानतोडून घरी आणतात व पानाचा पुडा बांधून फळीवर पोहचवली जातात. अनेकदा जीव मुठीत धरून सर्व कामे करावी लागतात. इतर कामाकडे मात्र दुर्लक्ष होते. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असल्याने पाने तोडणार्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. तसेच पाने तोडण्यासाठी गेलेल्या नागरिकावर वन्यप्राण्यांचे हल्ले होण्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मजुरांच्या जीवीताला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे तेंदूपत्ता मजुरांना विमा लागू करण्याची मागणी मजुरांकडून होत आहे. (वार्ताहर)
तेंदूपत्ता संकलकांना विमा केव्हा लागू होणार?
By admin | Updated: May 9, 2014 03:05 IST