वरठी : भांडणाची तक्रार पोलिसात का? केली म्हणून आरोपीने अन्य सहकाऱ्यांसह फिर्यादी व साक्षदार यांच्या घरावर शस्त्र हल्ला केला. यात घराचे दरवाजे व खिडक्या तोडून घरातील महिलांना मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारला पहाटेच्या सुमारास वरठी येथे घडली.गुरुवारी रात्री रेल्वे स्थानकासमोरच्या एका दारु दुकानामध्ये बाबुलाल लोणारे हे त्यांचे मित्र अनिल वासनिक व आशिष बन्सोड यांच्या सोबत मद्यप्राशन करत असताना साजन देशभ्रतार याने बाबुलाल लोणारे यांच्याशी शुल्लक कारणावरून वाद घातला. त्यानंतर देशभ्रतारने दारूची रिकामी बाटली घेवून त्याला मारहाण केली. याप्रकरणी लोणारे हे तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ साजन देशभ्रतार याला चौकीत नेवून समज दिली. इजा जास्त नसल्यामुळे कारवाई करून रात्री त्याला सोडण्यात आले.पोलीस चौकीतून समज देवून सोडल्यानंतर रात्री देशभ्रतार याने सदर घटना नितीन मेश्राम याला सांगितली. त्यांनी अन्य मित्रांना रात्रीच बोलावले व पहाटे २.३० वाजता बाबुलाल लोणारे यांच्या घरावर शस्त्र हल्ला केला. दरवाजावर ठोकल्यामुळे बाबुलाल लोणारे याने खिडकीतून बघितले आणि मागच्या दारातून पळ काढला. यावेळी बाबुलाल यांचा दरवाजा न तुटल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा लगतच्या लोणारे यांचे मित्र आशिष बंसोड यांच्या घरावर नेला. त्यांच्या घराचा दरवाजा तोडून प्रवेश केला व कुटुंबीयांना मारहाण केली. यावेळी आशिष बन्सोड घरी नव्हते. त्यानंतर दुसरे साक्षदार अनिल बन्सोड यांच्याघरी पोहोचले. हल्ला होताच अनिलने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी जागे झाले. तोपर्यंत वॉर्डातील लोक एकत्र झाले होते.साजन देशभ्रतार यांच्यासोबत नितीन मेश्राम, बंटी मेश्राम, अक्षय देशभ्रतार, लोकेश मेश्राम, सुमित रामटेके व राजेश शहारे होते. गर्दी जमा होताच त्यांनी पळ काढला. त्यावेळी जमावाने अक्षय देशभ्रतार व लोकेश मेश्राम यांना जोरदार चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पहाटे मुख्य सुत्रधार नितीन मेश्रामला पोलिसांनी घरून अटक केली. तक्रारकर्त्याच्या बयानावरून पोलिसांनी भादंवि १४३, १४७, १७६, १४९, ४५२, ३२३, ४२७ व ५०४/५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने, हवालदार महादेव वंजारी, दुर्याेधन भुरे व फुलबांधे करत आहेत. (वार्ताहर)
वचपा काढण्यासाठी शस्त्राने हल्ला
By admin | Updated: September 6, 2014 01:33 IST