१८९७ मध्ये ब्रिटिशांनी मध्यप्रांत व वऱ्हाडचा भाग म्हणून भंडारा जिल्हा निर्माण केला होता. मध्यप्रांताची राजधानी नागपूर होती. जबलपूर हे दुसरे केंद्र होते. १८९१ च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनापासून स्वातंत्र्याचे वारे भंडारा जिल्ह्यात पोहोचले. प्रथम भंडारा व तुमसरात सुशिक्षितांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पुढाकार घेतला होता. तिसरे केंद्र गोंदिया बनले होते. १९२० मध्ये नागपूर अधिवेशनाला तरुण उपस्थित राहिल्याने अनेकांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली.गोळीबारापूर्वीची घटनातुमसरला त्यावेळी दररोज प्रभातफेरी काढण्यात येत असे. रात्री गुप्त बैठका होत असत. १० आॅगस्ट १९४२ ला माकडे गुरुजी व भिवाजी लांजेवार यांना ताब्यात घेण्यात आले होते. १० आॅगस्टला रात्री बाबुजी लांजेवार यांच्या राईस मिलमध्ये गुप्त बैठकीला ८० सदस्य उपस्थित होते. ही बैठक रात्री दोनपर्यंत चालली. येथे ‘करेंगे या मरेंगे’ चा निर्धार करण्यात आला. ही माहिती पोलिसांना मिळताच सर्कल इन्स्पेक्टर गोपाल सिंह व तुमसरचे इन्स्पेक्टर रवानी, सहाय्यक दिलावर खान, महंमद शफी यांच्या मदतीला भंडाऱ्यावरुन कुमक मागविण्यात आली होती. त्यामुळे तुमसरचे वातावरण गंभीर झाले होते. भंडाराहून तुमसरला जादा पोलिस कुमक पोहोचू नये, यासाठी मोहाडी नाल्याजवळ रात्रभरात रस्त्यावर खड्डे खणण्यात आले, झाडे तोडून रस्त्यावर अडथळा निर्माण करण्यात आला होता. भंडाऱ्याचे स्पेशल मॅजिस्ट्रेट जयवंत हे अगोदरच तुमसरला पोहचले होते. त्यादिवशी एकीकडे पोलिसांचे भयभीत वातावरण होते. दुसरीकडे घराघरातून निघालेली माणसे जुन्या गंज बाजारातून पोलिस ठाण्याला आग लावण्यासाठी जाऊ लागले. सकाळी ११ वाजता संतप्त जमाव पोलिस ठाणे रिकामे करा, वंदेमातरम, भारत माता की जय अशी घोषणा देत होते. वातावरण प्रक्षुब्ध बनले होते. पहिल्यांदा पोलिसांनी लाठीमार केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून नागरिकांनी दगडफेड सुरू केली. दंगल सुरू झाली. जमाव पोलिस ठाण्याच्या दिशेने जात असताना पोलिसांच्या लाठीमारासोबत ठाणेदार रवानी यांच्या पत्नीने हातात बंदूक घेऊन जमावाला धमकावण्याचा प्रयत्न करीत गोळी चालविली. यात श्रीराम धुर्वे या किशोरवयीन मुलाच्या डोक्यात गोळी शिरली. तिथेच ते गतप्राण झाले. त्यानंतर जमाव भडकला. जनसागर भडकल्याने पोलिसांनी गोळीबार सुरू केला. पोलिस अंधाधुंद गोळीबार करीत आहेत म्हणून मॅजिस्ट्रेट जयवंत यांनी स्वत:च गोळीबार करण्यासाठी सुरुवात केली. ५ ते ६ मिनिटात संतप्त तथा रक्तरंजीत घटना तुमसरात घडली. शहीदांचे मृतदेह एकत्रित करण्याकरीता नागरिक गोळा झाले. सदाशिवराव किटे, नत्थु पहेलवान आदींनी हिंम्मत दाखवून पोलिसांविरुद्ध पुढाकार घेतला. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. हे पाहून दामले गुरुजींनी एसडीओ जयवंतला ठणकाविले. ‘काय केले जयवंतजी’ आपण इंग्रज सत्तेचे नोकर, परंतु देशभक्तांशी अमानुष व्यवहार केला? छाती पुढे करत गोळी चालवा, असे आव्हान दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शहीद श्रीराम धुर्वे यांची अंत्ययात्रा डोंगरला घाटावर नेण्यात आली. त्यावेळी हजारो महिलापुरुष अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी दामले गुरुजी, नारायण कारेमोरे, सदाशिव किटे, वासुदेव कोंडेवार, नारबाजी पाटील, वा.गो. कुळकर्णी आदींना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर भंडारा, जबलपूर येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. देव्हाडीही अग्रभागीतुमसर रोड येथे मुंबई-हावडा रेल्वेस्थानक होते. चले जाव चळवळीने हे गाव दणानून गेले होते. बाजार चौकातील सभेत रामचंद्र फाये व पन्नालाल यांची भाषणे जोशपूर्ण झाली. यात ब्रिटिशांनी रेल्वे स्थानक जाळण्याचा निर्धार केला. परंतु दोघांनाही पोलिसांनी पकडले. देव्हाडीतून आठ जणांना तुरुंगात जावे लागले होते.
ब्रिटिशांच्या गोळीबारात सहा तरूणांना वीरमरण
By admin | Updated: August 9, 2015 00:59 IST