भुयार : जिल्ह्यातील विणकर बांधवांच्या हाताने निर्मित तलम रेशमी (कोसा) कापड जगात प्रसिद्ध आहे. मात्र या कापडासाठी लागणाऱ्या सुतासाठी पवनी तालुक्यातील निष्ठी येथे रेशमाचे किडे पाडून कोस निर्मिती केली जाते. १५० कुटूंब १५ वर्षापासून यात गुंतली आहे. गेल्या तीन महिन्यात तब्बल दोन कोटी रूपयांचे कोस उत्पादन करण्यात आले. जिल्ह्यातील विणकर बांधवांद्वारे हातमागावर तयार केलेले सुती व रेशमी कापड आजही प्रसिद्ध आहे. मात्र काळाच्या ओघात यंत्रमागात निर्मित कृत्रिम कापडाच्या स्पर्धेत जिल्ह्यातील पवनी, एकोडी, मोहाडी येथील हातमाग व्यवसायाला घरघर लागून उतरती कळा आली. परंतु या विणकर बांधवांकडून निर्मिती करण्यात येणाऱ्या कोसा कापडाला कोणताही पर्याय नाही. त्यामुळे आजही महानगरात कोसाच्या कापडाला चांगला भाव मिळतो. कोसाच्या कापडासाठी लागणारे रेशिम निर्मितीसाठी येणाच्या झाडावर रेशमाच्या किड्यांचे संगोपन केले जाते. बऱ्याच गावात याचे उत्पादन होत असले तरी पवनी तालुक्यातील निष्ठी येथे तब्बल १५० कुटूंब गावांजवळील जंगलात एकत्रितपणे रेशिमकोष निर्माण करतात. त्यासाठी वनविभागाद्वारे वनजमिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेशिम संचालनालयाद्वारे तांत्रिक मार्गदर्शन व अंडी पुरवठा केला जातो. नैसर्गीक आपत्ती व वातावरणातील बदलाचा या व्यवसायावर परिणाम होतो. गेल्या तीन महिन्यात तब्बल दोन कोटी उत्पादन येथील कोस उत्पादकांनी घेतले आहेत. वनविभागाद्वारे निष्ठी येथील रेशिम किडे बालकांसाठी गावाजवळील २०० हेक्टर वनजमीन उपलब्ध करून दिलेली आहे. या जागेत येन वृक्षांची लागवड करून यावर रेशिम किडीचे संगोपन केले जाते. १५० पेक्षा अधिक कुटूंबेही रेशमी शेती एकत्रीतपणे करतात. वर्षातून तीन हंगामात रेशमी कोस उत्पादन होते. त्यातील पावसाळ्यात थोडे कमी उत्पादन होते, असे रेशमपालक वामन डहारे, कवळू डहारे, प्रल्हाद दिघोरे, भगवान डहारे, जयराम डहारे यांनी सांगितले. त्यांना रेशीम व्यवसाय विकास विभागाद्वारे तांत्रिक प्रशिक्षण व अंडी पुरवठा केला जातो. रेशिम किडीची १०० अंडी घेण्यासाठी विभागात ६०० रूपये भरावे लागतात. हंगामच्या सुरूवातीला एका कुटूंबाकडून साधारणत: १० हजारांपेक्षा अधिक अंडी खरेदी करून त्यातून बाहेर येणाऱ्या अळीचे येन वृक्षावर संगोपन केले जाते. गेल्या हंगामात निष्ठी येथील रेशिम उत्पादकांनी दोन कोटी रूपयांचे कोस उत्पादन केले. यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील विणकर बांधवांना कोसा कापड निर्मितीसाठी अधिकप्रमाणात रेशिम उपलब्ध होवू शकेल, अशी आशा आहे. परंतु अधिक उत्पादन होवूनही यावर्षात खरेदीदार पाहिजे त्या प्रमाणात येत नाहीत, अशी चिंता विलास डहारे यांनी व्यक्त केली. निष्ठीकरांप्रमाणे रेशिम उत्पादन केल्यास पर्यावरणाचे रक्षण होवून हातात पैसे येतील याच शंका नाही. (वार्ताहर)
दोन कोटींचे कोश उत्पादन
By admin | Updated: March 25, 2015 00:45 IST