डिजिटलायझेशनचा प्रभाव : परीक्षांपुरतेच उरले पुस्तकांचे वाचन भंडारा : 'वाचाल तर वाचाल', असे म्हटले जाते. आधुनिक युगातील विद्यार्थ्यांसहीत युवकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातही पुस्तकांचे वाचन करीत असलेल्या युवकांची संख्याही नगन्य आहे. परिणामी वाचन संस्कृतीच संकटात सापडली असल्याचे बोलल्या जात आहे. केवळ सोशल मीडियावरील डिजिटल वाचनाकडेच युवकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा आहे. त्यामुळे परीक्षेच्या तोंडावर जुजबी पुस्तकी वाचन करण्याकडे कल वाढत आहे.देशातील महान कवी, संत, शास्त्रज्ञ, साहित्यिक, लेखक आदीनी आपले विचार ग्रंथरुपाने आपल्याला दिले आहे. या पुस्तकांचे युवकांनी वाचन करणे अत्यावश्यक आहे. पूर्वी खेड्यापाड्यातही युवकांचे वाचनाचे प्रमाण हे मोठे होते. परंतु आता वाचनालयात युवा वाचकांची संख्या अत्यंत तोकडी असते. याउलट इंटरनेट कॅफेमध्ये तसेच मोबाइलवर सोशल मीडियावरच युवक मग्न असताना दिसतात. जगण्यासाठी जसे अन्न आवश्यक आहे, तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनही अत्यंत गरजेचे आहे. जगण्याची उमेद निर्माण करणारे साहित्य वाचणे गरजेचे आहे. मात्र हल्ली युवकांना पुस्तके वाचण्याचा कंटाळा येत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्या मुले सर्वाधिक काळ दूरचित्रवाणी संचासमोर बसलेले आढळतात. आपला बराच वेळ चित्रपट, मालिका व इतर कार्यक्रम बघण्याकडे घालवितात. केवळ परीक्षा आली की अभ्यासापुरतेच वाचतात परिणामी विद्यार्थी केवळ परीक्षार्थीच झाल्याचे निदर्शनास येते. तसेच डिजिटल साहित्याकडे ओढा वाढत आहे. साहित्याचे डिजिटलाझेशन होत असल्याने आॅनलाईन साहित्य वाचनाकडे जिल्ह्यातील युवकांचा कल वाढत आहे. ही बाब चांगली असली तरी नेटवरील साहित्य पुरेसे बरोबर आहे का? याची शहानिशा न करता ते वाचले जाते. त्यामुळे चुकीचे ज्ञानही मिळते. परीक्षा आली की नोट्सरुपी साहित्य वाचले जाते. त्यामुले विद्यार्थी सखोल ज्ञानापासून वंचित राहतात. या कारणाने ते केवळ परीक्षार्थी होत असल्याचे दिसते. यामुळे परीपूर्ण व्यक्तिमत्व विकास होताना अडथळे निर्माण होत असल्याचे जाणवते. (प्रतिनिधी)
डिजिटल साहित्याकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल
By admin | Updated: July 15, 2015 00:44 IST