फटका डॉक्टरांच्या आंदोलनाचा : सामान्य रुग्णालयात रुग्णांचे हाल अन् हाल भंडारा : मुलभूत सुविधांपैकी व अतिआवश्यक असलेले आरोग्य सुविधा सध्या रुग्णांसाठी जीवघेणे ठरू पाहत आहे. ज्या डॉक्टरांना परमेश्वराचा दर्जा दिला गेला तेच डॉक्टर आंदोलन करीत असल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे हाल..बेहाल झाले आहेत. जिल्हा रुग्णालयासह ३३ प्राथमिक रुग्णालयातील रुग्ण उपचारासाठी तरसत आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांसाठी दि.२८ मे पासून बंड पुकारले आहे. त्यात प्राथमिक स्वरूपात सर्व प्रकारच्या बैठकांवर बहिष्कार घालण्यात आला. परिणामी रुग्णांसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन व दिशानिर्देश मिळणे बंद झाले आहे. तसेच दि.३0 पासून जिल्ह्यातील ३५0 पेक्षा जास्त डॉक्टरांनी असहकार आंदोलन पुकारले आहेत. जिल्हा मुख्यालयात आंदोलनही सुरू आहे. मात्र डॉक्टर आंदोलन मंडपी उपस्थित असल्याने रुग्णालयात मात्र रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. परिचारिका रुग्णांची तपासणी व अनुभवाच्या आधारे औषधी देत आहेत. बोटांवर मोजण्या इतके डॉक्टर रुग्णांची तपासणी करीत असले तरी पुरेसे नाही. जिल्हा रुग्णालयासह रुग्णालयात दिवसाकाठी रुग्णांची गर्दी होत असते. गंभीर आजारासाठी भरती रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांचा वाणवा आहे. (शहर प्रतिनिधी)
परिचारिका करताहेत रूग्णांवर उपचार
By admin | Updated: May 31, 2014 23:15 IST