जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : तंबाखू नियंत्रण समितीची सभाभंडारा : तंबाखू खाण्यामुळे शरिरावर दुष्परिणाम होतात. सोबतच कर्करोग होण्याची शक्यताही असते. शाळा परिसरातील दुकाने, पानटपरी, हॉटेल्समधून तंबाधूची विक्री होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. विद्यार्थी आणि लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करण्यासाठी तंबाखूविरोधी कार्यक्रम व जनजागृती मेळावे घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याअंतर्गत आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला जिल्हा शल्य चिकित्सक सचिव डॉ.रविशेखर धकाते, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, भंडाराचे मुख्याधिकारी अनिल अडागळे उपस्थित होते.यावेळी डॉ.चौधरी म्हणाले, अन्न औषध प्रशासनाने दररोज दहा धाडी मारून संबंधित वस्तुंची तपासणी करावी. पहिली ते सातवीपर्यंत शाळांमधून तंबाखूविरोधी कार्यक्रम राबवावे. विद्यार्थ्यांच्या घरी तंबाखू खाणाऱ्याची माहिती संकलीत करावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांकडून याची माहिती घ्यावी. शिक्षक व मुख्याध्यापकांनी सुद्धा शाळांमध्ये तंबाखू खाणे व धुम्रपानावर बंदी घालावी. तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना राबवावी. पालक सभा व शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत तंबाखूविरोधी जनजागृती करावी. पालिकेने शाळा तंबाखुमुक्त करण्याची मोहिम राबवावी, अशा सूचना दिल्या. तंबाखूजन्य पदार्थावर प्रतिबंध याविषयी त्यांनी माहिती दिली. (नगर प्रतिनिधी)
तंबाखूविरोधी कार्यक्रम राबवा
By admin | Updated: August 10, 2016 00:23 IST