मासळ : बसफेरी वाढवण्यासाठी मासळ - बेलाटी - कोंढा या मार्गावरील बेलाटी येथे सामाजिक कार्यकर्ते मनोज चुटे यांच्या नेतृत्वात तब्बल अडीच तास रास्ता रोको करून विद्यार्थ्यांनी एस.टी. महामंडळाविरुद्ध रोष व्यक्त केला.मासळ परिसरातील ढोलसर, मासळ, बेलाटी, घोडेझरी, सोनेगाव, पेंढरी, हरदोली, परसोडी, पाऊलदवणा, घरतोडा, खैरी आदी १२ गावातील सुमारे १२५ विद्यार्थी कोंढा, अड्याळ येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज बसने ये जा करतात. या मार्गावर बऱ्याच दिवसांपासून अपुऱ्या बसफेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर महाविद्यालयात पोहचता येत नाही. त्यामुळे त्यांचे दररोज शैक्षणिक नुकसान होत होते. या मार्गावर गडचिरोली - तुमसर ही लांब पल्ल्याची बस मासळ येथे सकाळी ९ वाजता येते. परंतु दूरवर प्रवास करणारे प्रवासी असल्यामुळे विद्यार्थ्यांना जागाच मिळत नव्हती व वाहक व चालक विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास असमर्थ होते. मागील शुक्रवारी २३ सप्टेंबरला भंडारा आगार प्रमुखाला या संदर्भात निवेदन देवून अतिरिक्त बसफेरीची मागणी करण्यात आली होती. परंतु संबंधित विभागाचे विद्यार्थ्यांच्या मागणीकडे कानाडोळा केला. यामुळे विद्यार्थ्यांचे फारच शैक्षणिक नुकसान होत होते. आठवडा लोटत असतानाच विद्यार्थ्यांचा रोष वाढतच गेला व आज शेवटी नाईलाजास्तव सामाजिक कार्यकर्ते मनोज चुटे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला.विद्यार्थ्यांनी आश्वासासोबत ठोस कारवाई होईपर्यंत हलायचे नाही अशी भूमिका घेतली. ११ वाजता शेंडे आगार व्यवस्थापक पवनी यांनी घटनास्थळी भेट दिली व उद्यापासून तुमसर - गडचिरोली - तुमसर अशी अतिरिक्त बस फेरी सुरु करण्याचे आश्वासन दिले. या बसफेरी व्यतिरिक्त पुन्हा सायंकाळी तुमसर गडचिरोली सुद्धा अतिरिक्त फेरी सुरु करण्याचे आश्वासन दिल्याने सायंकाळी होणारी विद्यार्थ्यांची त्रेधातिरपीट दूर होणार आहे. (वार्ताहर)
बेलाटी येथे विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
By admin | Updated: September 29, 2016 00:36 IST