भंडारा : अनैतिक व्यापारामध्ये अडकलेल्या महिला व मुलींची सुटका करण्यासाठी जिल्हास्तरावर एक विशेष पथक तयार करण्यात यावे. यामध्ये विशेष पोलीस अधिकारी, सामाजिक संस्थांचे दोन प्रतिनिधी, महिला पोलीस अधिकारी यांचा समावेश असावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी दिल्या आहेत.सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला महिला बालकल्याण समितीच्या सभापती रेखा भुसारी, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलीस उपअधीक्षक संतोष कुंभारे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, मविमच्या जिल्हा समन्वयक ज्योेती निंभोरकर आदी उपस्थित होते.या बैठकीत महिलांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. महिलांच्या विकासाच्या योजना राबविणाऱ्या विभागांचा आढावा घेण्यात आला. महिला व बालविकास कार्यालयामार्फत १०९१ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. अडचणीत असलेल्या महिला या क्रमांकावर फोन करुन मदत मागू शकतात, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.जे. चव्हाण यांनी दिली. $ि$िजल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या समुपदेशन केंद्रांना राज्य महिला आयोगाची मान्यता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. माविमच्या माध्यमातून २५ गावांमध्ये महिलांसाठी तंबाखुमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच माविमच्यामार्फत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, जाणीवजागृती करणे व महिलांसाठी असलेल्या कायद्याची माहिती देण्यात येते, असे ज्योती निंभोरकर यांनी सांगितले. विशाखा गुप्ते यांनी व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच मृणाल मुनिश्वर यांनी घटस्फोटीत, विधवा, महिलांच्या नावे रेशनकार्ड देण्याची मागणी केली. या बैठकीला प्रिया शहारे, वैशाली सतदेवे, रजनी घडले, रुबीना पटेल, आंबेडारे उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)
महिलांच्या सुटकेसाठी विशेष पथक
By admin | Updated: August 7, 2014 23:48 IST